मुंबई -: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडोपी (ता. मालवण) येथे सापडलेली कातळशिल्पे (रॉक आर्ट, पेट्रोग्लिफ्स) ही अंदाजे इ.स. पूर्व चार ते सात हजार वर्षापूर्वी नवाश्मयुगातील आदिमानवाने केलेली अभिव्यक्ती आहे. याठिकाणी असलेल्या 60 हून अधिक कातळशिल्पांमध्ये असलेले मातृदेवतेचे कातळशिल्प विशेष उल्लेखनीय आहे. संपूर्ण देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच जगासमोर आलेला हा अनमोल खजिना जतन करुन त्याची नीट प्रसिद्धी केल्यास सिंधुदुर्ग रॉक आर्टच्या जागतिक नकाशावर मानाचे स्थान पटकावेल, असा विश्वास हौशी रॉक आर्ट संशोधक व रॉक आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे सदस्य सतीश लळीत यांनी आज येथे व्यक्त केला.
कर्नाटकातील बदामी येथील शिवयोगमंदिर संस्थेच्या सभागृहात भरलेल्या रॉक आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या 17व्या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये श्री. लळीत यांनी आपल्या शोधनिबंधाचे सादरीकरण केले, त्यावेळी ते बोलत होते. त्यावेळी देशभरातून जमलेल्या रॉक आर्ट क्षेत्रातील तज्ज्ञ, तसेच हौशी संशोधकांनी या शोधाबद्दल व सिंधुदुर्ग जिल्हा प्रथमच रॉक आर्ट नकाशावर येत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
यावेळी रॉक आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आर. सी. अग्रवाल (गाझियाबाद), सरचिटणीस प्रा. गिरीराज कुमार (आग्रा), सहसचिव अर्कित प्रधान, ज्येष्ठ पुरातत्वज्ञ डॉ. ए. सुंदरा, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे प्रादेशिक संचालक डॉ. डी. दयालन (बंगळुरु), ज्येष्ठ मानववंश शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ चक्रवर्ती (कोलकाता), स्थानिक संयोजक डॉ. शीलकांत पत्तर, रॉक आर्ट क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
लळीत यांनी या राष्ट्रीय स्तरावरील काँग्रेसमध्ये केलेल्या सादरीकरणात मालवण तालुक्यातील हिवाळे आणि कुडोपी येथील कातळशिल्पांची सविस्तर माहिती छायाचित्रांसह दिली. ही कातळशिल्पे इ.स. पूर्व 4000 ते 7000 वर्षांपुर्वीची असून अत्यंत महत्वाची असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. जगाच्या विविध भागात आदिमानवाने खोदलेली अशी कातळशिल्पे, दगडावर रेखाटलेली रंगचित्रे आढळून येतात. ती रॉक आर्ट म्हणून जगभरात ओळखली जातात. मध्यप्रदेशातील भीमबेटका येथील गुहेतील रंगचित्रे रॉक आर्टचाच एक प्रकार आहे.
कुडोपी या मालवण तालुक्यातील गावाजवळच्या डोंगरावरील जांभ्या दगडाच्या कातळावर (सड्यावर) सुमारे साठ कातळशिल्पे खोदण्यात आली आहेत. यामध्ये मानवाकृती, मासे, विविध प्रकारची वर्तुळे, पक्षी, चित्रविचित्र आकृती मोठ्या प्रमाणात आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने एकाच ठिकाणी अशी कातळशिल्पे आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. याठिकाणी आढळलेले मातृदेवतेचे शिल्प विशेष उल्लेखनीय आहे. हिवाळे येथील सड्यावरही अशाच कातळशिल्पांचा शोध श्री. लळीत व त्यांचे बंधु प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी 2002 मध्ये लावला होता. गोव्यातील उसगाळीमळ, महाराष्ट्र-गोवा सीमेवरील विर्डी, हिवाळे, कुडोपी, खानवली (राजापूर), निवळी (रत्नागिरी) अशा अनेक ठिकाणी पश्चिम किनारपट्टीवर ही कातळशिल्पे आढळली असून त्यामध्ये काही परस्परसंबंध (लिनिएज) असण्याची शक्यता लळीत यांनी व्यक्त केली आहे. लळीत हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे रहिवासी असून सद्या मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
* कुडोपीच्या शिल्पाकृती अप्रतिम : डॉ. सुंदरा
कुडोपी येथील कातळशिल्पांची छायाचित्रे पाहुन आपण थक्क झालो. ही सर्व कातळचित्रे नवाश्मयुगातील असून या कातळशिल्पांमधील वैविध्य, रचना, कलाकारी, सौंदर्य, प्रमाणबद्धता अतुलनीय आहे. हे स्थळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे असून त्याचे नीट जतन होणे आवश्यक आहे. या कातळशिल्पांचा दर्जा पाहता त्या काळात या परिसरात वास्तव्य करणारा मानवी समुह अतिशय प्रगल्भ असला पाहिजे, असे मत प्रसिद्ध पुरातत्वज्ञ डॉ. सुंदरा यांनी व्यक्त केले.
पुरातत्वीय दृष्ट्या खूप महत्वाची आणि या भागातील आदिम मानवी समूह व त्यांची वसतीस्थाने यांच्याबद्दल माहिती उपलब्ध होऊ शकेल, अशी कुडोपी व हिवाळे सारखी अनेक ठिकाणे कोकण किनारपट्टीवर आहेत. मात्र, त्यांचे तज्ज्ञांकडून वाचन होणे, अर्थ लावणे, त्यांचा कालावधी निश्चित करणे आवश्यक आहे. त्यामुळे कोकण प्रदेशाच्या इतिहासावर अधिक प्रकाश पडण्याची शक्यता आहे. तसेच, पर्यटनदृष्ट्याही हे स्थळ विकसित केल्यास जिल्ह्याच्या पर्यटन विकासालाही त्याचा हातभार लागेल. यासाठी शासनास संबंधित क्षेत्र अधिग्रहीत करुन संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर करावे लागेल. आपण तशी विनंती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नारायण राणे यांना करणार असल्याचे लळीत यांनी सांगितले.
कुडोपी येथील शोध मोहिमेमध्ये मालवणचे चंद्रवदन कुडाळकर, गुरुनाथ राणे, गौरीश काजरेकर, शुभेन्दू लळीत, गणेश मेस्त्री, गणेश कुशे, कुडोपीचे रहिवासी संतोष वरक यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे लळीत यांनी म्हटले आहे.