स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आजवर आपण प्रगतीचा मोठा टप्पा गाठला आहे. ही प्रगती साध्य करताना माहिती तंत्रज्ञान क्रांतीचा मोठा फायदा झाला परंतु जीवनमानाचा दर्जा समतोल राखण्यासाठी नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करून शाश्वत विकास साधणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अधिकाधिक घटकांमध्ये पर्यावरण विषयक जागृती निर्माण करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये तर प्रकर्षाने ते काम केले पाहिजे. याच उद्देशाने राष्ट्रीय हरितसेनेंतर्गत राज्यभरातील शाळांमध्ये `इको क्लब` स्थापन केले आहेत. त्यामाध्यमातून प्रबोधनाचे मोठे काम सुरू आहे.
पर्यावरण व वनविषयक विविध बाबींवर चर्चा करण्यासाठी 2001 मध्ये कोईमतूर येथे सर्व राज्याच्या वन व पर्यावरण मंत्र्यांची परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेने वन व पर्यावरणाविषयीची `कोईमतूर सनद` अवलंबिण्याचा एकमताने निर्णय घेतला. त्यात शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणात्मक शिक्षण व जागृती निर्माण करणे या बाबींचाही समावेश होता.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात इको क्लब स्थापन करण्यात आला असून आतापर्यंत राज्यात एकूण आठ हजार 884 इको क्लब स्थापन झाले आहेत. प्रत्येक इको क्लबमध्ये अंदाजे 50 विद्यार्थी/विद्यार्थींनी सहभागी झाले आहेत. या क्लबसाठी शिक्षक असावेत म्हणून काही शिक्षकांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. राज्य पातळीवर या योजनेचे संनियंत्रण करण्यासाठी पर्यावरण विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय संनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या योजनेमध्ये विविध शासकीय विभागांचा सक्रिय सहभाग वाढविणे, इको क्लबसाठी राज्यास अनुरुप अशी कामे सुचविणे व त्यांची अंमलबजावणी करणे आदी कामे राज्यस्तरिय संनियंत्रण समितीतर्फे करण्यात येतात.
जिल्हा पातळीवर या योजनेची अंमलबजावणी व संनियंत्रण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अंमलबजावणी व संनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. इको क्लबमार्फत प्रामुख्याने घरातील कचऱ्याची विल्हेवाट, जैविक घनकचऱ्याची विल्हेवाट, पाणी साठवण व प्रदूषण, हवा प्रदूषण, नागरी सुखसोयींच्या अभाव, झाडे लावणे व संवर्धन करणे, सार्वजनिक वाहनतळ व बगीचा, लोकांमध्ये पर्यावरण विषयक जागृती निर्माण करणे व जैव विविधता संवर्धन या विषयावर उपक्रम राबविणे अभिप्रेत आहे.
सन 2007-08 पासून या कार्यक्रमांतर्गत इको क्लब मार्फत वृक्ष लागवड, बी पेरणी, वृक्षदिंडी, बायोकल्चर प्रकल्प प्रात्यक्षिके, निसर्ग सहली, पर्यावरण रॅली, गांडूळ खत निर्मिती प्रकल्प, व्याख्याने/चर्चासत्रे/प्रश्नमंजुषा आदी कार्यक्रम घेण्यात आले. तसेच विविध सण/उत्सवांचे पर्यावरणपूरक पध्दतीने आयोजन करण्यात आले होते. आजवर विविध कारणास्तव आपण निसर्गाकडून अनेक गोष्टींचा उपभोगच घेत आलो आहोत. त्यामुळे पर्यावरणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अनेक प्रजाती नाश पावल्या असून काही प्रजातींवर गंभीर संकट ओढवलेले आहे. अशा परिस्थितीत आता त्यांचे जतन करणे आवश्यक आहे. ही बाब समाजाच्या व विशेषत: राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजवण्याचा यामागे प्रमुख उद्देश आहे. यासाठी सामाजिक वनीकरण संचालनालयामार्फत समयबध्द कार्यक्रमांचा आराखडा बनविण्यात आला आहे. पर्यावरण विषयक जागृती सर्वदूर पोहोचावी या उद्देशाने `ऋणानुबंध` हे मासिक सुरु करण्यात आले. याशिवाय विविध कार्यक्रमानुरुप भित्तीपत्रके तयार करण्यात येत असून कॅलेंडर्स, मासिके व भित्तीपत्रके सर्व इको क्लबना पोहोचविली जातात व त्याद्वारे जनजागृती करण्यात येते.
राष्ट्रीय हरित सेना योजनेचे कार्यक्रम अधिक व्यापक करण्यासाठी त्यामध्ये राज्यातील समविचारी शासकीय विभागांचे तसेच अशासकीय संस्थांचे/व्यक्तींचे सहकार्य प्राप्त करुन घेण्याचे ठरविले आहे. सदर उपक्रम राबविताना त्यामध्ये सुसूत्रता यावी व निरनिराळ्या शाळांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होऊन त्यांच्या उपक्रमांची गुणवत्ता वाढावी या उद्देशाने राज्यातील सर्व शाळांमध्ये 'पंचतारांकित हरित शाळा' पुरस्कार योजना राबविण्यात येत आहे. तसेच इको क्लबना पर्यावरणाविषयी शास्त्रोक्त माहिती मिळावी या उद्देशाने सामाजिक वनीकरण विभागामार्फत स्थापन केलेल्या आदर्श रोप वाटिकांमध्ये प्रत्येक जिल्ह्यात किमान एक याप्रमाणे NGC Park (राष्ट्रीय हरित सेना उद्यान) स्थापन करण्यात येत आहेत. याव्यतिरिक्त वाढत्या वृक्षतोडीला आळा बसावा व वृक्षराजीचे संवर्धन व्हावे याकरिता लोकांच्या मनातील ईश्वराबाबतच्या श्रध्देचा उपयोग पर्यावरण संतुलन करणेकरिता 'श्रध्दावन' ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत असलेल्या राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील सर्व धर्माच्या श्रध्दास्थान ठिकाणी हरित सेनेच्या सहकार्यातून श्रध्दावन साकारण्यात येत आहेत.
या योजनेच्या माध्यमातून गेल्या वर्षात विविध उपक्रम राबविण्यात आले. मार्चमध्ये होळी सणाचे निमित्त साधून 'खेलो होली, इको फ्रेंडली' हा कार्यक्रम घेण्यात आला. घरच्या घरी पर्यावरणपूरक रंग कसे बनविता येतील त्याबद्दल प्रशिक्षण देण्यात आले. तसेच इको क्लबच्या विद्यार्थ्यांमार्फत 'एक गाव एक होळी' व कचऱ्याचे ज्वलन करुन प्रतिकात्मक होळी करण्याबाबतचे अभियान राबविण्यात आले. यास सर्व स्तरावरुन पाठिंबा मिळून मोठ्या प्रमाणावर जनजागृती होण्यास मदत झाली.
* थोरात काशीबाई