आपल्या सभोवताली स्वच्छ हवा, निर्मळ पाणी आणि शांत वातावरण म्हणजे उत्तम पर्यावरण. पण याच घटकांना बाधा आल्यास मानवी जीवनसुद्धा असह्य होते. इतर प्राणीमात्र आणि जैवविधताही धोक्यात येते. ते टाळण्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक आहे. त्यासाठी शासन विविध माध्यमांतून प्रयतत्नशील आहे. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी विविध उपाययोजना आणि कायदे केले आहेत. त्यांची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून केली जाते. त्याविषयी...
पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालचा परिसर. त्यात वातावरण, भू-आवरण, जलावरण या अजैविक घटकांचा आणि जीवावरण या जैविक घटकांचा समावेश होतो. हे सर्व घटक निसर्गनिर्मित आहेत. याशिवाय पर्यावरणात घरे, रस्ते, कारखाने, धरणे, पूल, वाहने आदी मनुष्यनिर्मित घटकांचाही समावेश होतो. मनुष्यनिर्मित घटकांनी बनलेल्या पर्यावरणाला `सांस्कृतिक पर्यावरण` म्हटले जाते. निसर्गनिर्मित व मनुष्यनिर्मित आपल्या भोवतालचे घटक म्हणजे पर्यावरण. मानवाचा निसर्गात हस्तक्षेप वाढल्यापासून पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळेच आज ग्लोबल वॉर्मिंगसारखे म्हणजे जागतिक तापमान वाढीचे संकट उभे ठाकले आहे. त्याचे विपरित परिणाम आपण त्सुनामी, 26 जुलै, 2005 अतिवृष्टी अमेरिकेतील कॅटरिना, अगदी कालपरवाचे `नर्गिस` वादळ, ऑस्ट्रेलियातील दुष्काळ, जागतिक पातळीवर गहू उत्पादनातील घट आदी स्वरुपात भोगत आहोत.
भविष्यातील आणखी अरिष्ट्ये टाळण्यासाठी पर्यावरणाचे संतुलन राखणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने विविध उपाययोजना आणि कायदे केले आहेत. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून त्यांची अंमलबजावणी केली जाते. महाराष्ट्र प्रदूषण प्रतिबंधक कायद्यानुसार 7 सप्टेंबर 1970 मध्ये मंडळाची स्थापना झाली. त्यावेळी `जल प्रदूषण नियंत्रण मंडळ` असे नाव होते. परंतु 1974 च्या अधिनियामानंतर 1981 मध्ये `महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ` असे नामकरण झाले. सर्वसाधारणपणे अध्यक्ष, सदस्य सचिव, शासकीय व अशासकीय सदस्य अशा स्वरुपाची मंडळाची रचना आहे. याशिवाय विविध तज्ज्ञ, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही मंडळात समावेश आहे. राज्याच्या पर्यावरण विभागाच्या प्रशासकीय नियमनाखाली मंडळ कार्यरत आहे.
मंडळातर्फे सध्या राष्ट्रीय नदी कृती योजनेंतर्गत राज्यातील प्रमुख नद्यांच्या शुद्धीकरणासाठी विशेष योजना राबविली जात आहे. त्यात कृष्णा आणि गोदावरी नदीचा समावेश आहे. या योजनेच्या माध्यमातून या नद्यांच्या काठावरील कराड, सांगली, नाशिक, त्र्यंबकेश्वर व नांदेड शहरातील सांडपाण्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचबरोबर पवई (मुंबई) तलाव, महालक्ष्मी सरोवर (वडगाव) तसेच ठाणे शहरातील 9 तलावांचेही शुद्धीकरणाचे काम सुरू आहे.
प्रमुख शहरांतील जैव वैद्यकीय घनकचरा व्यवस्थापनाचे काम विविध ठिकाणी सुरू आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून अशा कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी मार्गदर्शन केले जाते. घातक घनकचरा व्यवस्थापनावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. भारतात निर्माण होणाऱ्या घातक घनकचऱ्यापैकी अर्ध्यापेक्षा अधिक घातक घनकचरा महाराष्ट्रात निर्माण होतो. त्याच्या विल्हेवाटीसाठी राज्यात उल्लेखनीय काम झाले आहे. त्याचबरोबर बुटीबोरी (नागपूर), शेंद्रे (औरंगाबाद) आणि रांजणगाव (पुणे) येथे घनकचऱ्यासाठी सामुहिक प्रक्रिया यंत्रणा उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सांडपाण्यामुळे निर्माण होणारे प्रदूषण रोखण्यासाठी ठिकठिकाणी सामुहिक सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा उभारण्याचे काम सुरू आहे. काही ठिकाणी पूर्वीच अशी यंत्रणा कार्यरत आहे. या उपाययोजनेमुळे परिसरातील पाण्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षण व संवर्धनाची बिजे लहानपणापासूनच रुजविण्याच्या उद्देशाने 5 वी ते 12 पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा नॅशनल ग्रीन कॉपर्स योजनेत समावेश केला आहे. त्याद्वारे विविध शाळांमध्ये इको क्लब स्थापन करून पर्यावरण जागृतीचे काम हाती घेतले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या प्रयत्नांतून ही योजना साकारली आहे.
राज्यस्तरावर पर्यावरण माहिती प्रणाली केंद्र स्थापन केले आहेत. त्याद्वारे देश व देशाबाहेर पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, संघटना, शासन यांची वेबसाईट तयार करून पर्यावरण माहिती राजमार्ग (महामार्ग) तयार करण्याचा उद्देश आहे. त्याद्वारे शास्त्रज्ञ, अभियंते, संशोधक आदींना विविध माध्यमातून माहिती उपलब्ध व्हावी हा मुख्य उद्देश आहे. शासनाने प्लॅस्टिकच्या अनिर्बंध वापरावर नियंत्रण आणण्यासाठी कायदा केला आहे. त्यानुसार विशिष्ट प्रकारच्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळ्यात गटारे व नाले तुंबण्याचे प्रकार थांबण्यास मदत होणार आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीत मंडळासोबत स्थानिक स्वराज्य संस्थांचाही समावेश आहे.
* मंडळाची प्रमुख कामे *
* शासनाने केलेल्या पर्यावरण विषयक कायद्यांची व नियमांची अंमलबजावणी करणे
* प्रदूषण प्रतिबंधासाठी व्यापक कार्यक्रम आखून त्याची अंमलबजावणी करणे
* प्रदूषण नियंत्रणविषयक माहितीचे संकलन करून जनजागृतीसाठी ती प्रसिद्ध करणे
* जलस्त्रोताच्या गुणवत्तेचे रक्षण करणे आणि त्यात सुधारणा करणे
* हवेच्या दर्जाचे रक्षण करणे व वायू प्रदूषणास आळा घालणे
* कचऱ्याचा फेरवापर करण्यासाठी विविध संस्था, संघटनांना सहाय्य करणे
* विविध प्रकल्पांचे बांधकाम, ध्वनीक्षेपक, सणउत्सवांतील आतषबाजी, कर्णकर्कश संगीत, वाहनांचा आवाज
आदींच्या ध्वनी पातळीचे नियंत्रण करणे
* काशीबाई थोरात