नळदुर्ग -: अणदूर (ता. तुळजापूर) येथील राष्‍ट्रीय महामार्गालगत असलेल्‍या वत्‍सलानगर ते नळदुर्ग या पाच किमी अंतरामध्‍ये गतीरोधक, लक्षवेधी सुचनाफलक बसवून या महामार्गावरील सततच्‍या वाहन अपघात व जीवितहानी टाळण्‍याची मागणी पंचायत समिती सदस्‍य साहेबराव घुगे यांनी कार्यकारी अभियंता राष्‍ट्रीय महामार्ग उस्‍मानाबाद यांच्‍याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राष्‍ट्रीय महामार्ग क्रमांक नऊवर नळदुर्ग शहर व अणदूर हे गाव वसलेले आहे. या ठिकाणी ऐतिहासिक प्रसिद्ध किल्‍ला व तीर्थक्षेत्र श्री खंडोबाचे मंदीर आहे. पाऊण लाखाच्‍या जवळपास लोकसंख्‍येचा विस्‍तार होत आहे. तुळजापूर तालुक्‍यातील सर्वात मोठा आठवडी बाजार अणदूर या ठिकाणी भरतो. तसेच येथील शैक्षणिक वातावरण चांगले असल्‍याने विद्यार्थी बाहेरगावाहुन शिक्षणासाठी मोठ्याप्रमाणावर येतात. त्‍यामुळे विद्यार्थी, व्‍यापारी, भाविकांची वर्दळ सतत सुरू असते. राष्‍ट्रीय महामार्गावरून जाणारे कंटनेर, मालवाहतुक, जडवाहने व छोट्यामोठ्या वाहनांच्‍या संख्‍येत दिवसेंदिवस वाढ होत असून येथील महामार्ग चढउताराने निर्माण झाला आहे. वाहनांच्‍या भरधाव वेगामुळे अनेकांना अपघात होऊन आपला प्राण गमवावे लागले आहे. विशेष म्‍हणजे नळदुर्ग शहर ओलांडून सोलापूरकडे जात असताना दोन उतार व लगेच अणदूर गाव, वत्‍सलानगर वस्‍ती असल्‍याने वाहनांना गती राहते तर काही वाहनचालक गाडी न्‍युटल करून वाहने चालवितात. याचा अंदाज प्रवासी वर्गाला येत नाही. त्‍यातच मागेपुढे होण्‍याच्‍या बेतात किंवा वाहनाच्‍या भरधावामुळे वाहन नियंत्रणात राहत नसल्‍याने बहुतांश अपघात झालेले आहेत. या गंभीर बाबी लक्षात घेऊन अणदूर जवळील हे दोन्‍ही उतार व वत्‍सलानगर वस्‍तीजवळ अपघातातुन होणारी मनुष्‍यहानी टाळण्‍यासाठी राष्‍ट्रीय महामार्ग विभागाने लक्षवेधी सुचनाफलक, गतीरोधक निर्माण करून भविष्‍यात होणारी हानी टाळावी, अशी मागणी घुगे यांनी केली आहे. निवेदनाची प्रत उस्‍मानाबाद जिल्‍हाधिकारी यांना देण्‍यात आली आहे. 
 
Top