नळदुर्ग -: खुदावाडी (ता. तुळजापूर) ग्रामपंचायत अंतर्गत येणा-या घोडके तांडा येथील पाणीटंचाई त्वरीत दूर करावी व रस्ता दुरूस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा, या मागणीचे निवेदन नागरिकांनी अणदूर (ता. तुळजापूर) येथे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट देऊन दिले.
तुळजापूर तालुक्यातील घोडके तांडा व खुदावाडीपासून साधारणतः दोन किलोमीटर अंतरावर असलेला रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. या रस्त्यावर खडी टाकली आहे. रस्त्यावर मोठ्याप्रमाणात खड्डे व अस्ताव्यस्त पडलेल्या खडीमुळे नागरिकांना ये-जा करण्यास त्रास होत आहे. हा रस्ता त्वरीत दुरूस्त करून त्यावर डांबरीकरण करण्याचे तात्काळ आदेश पालकमंत्र्यांनी दिल्याने नागरिकांमधून याबाबत समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच या तांड्यांना सध्या तीव्र पाणीटंचाईने ग्रासले असून कायमस्वरूपी पाणीटंचाई दूर करण्यासाठी विविध उपाययोजना, खुदावाडी साठवण तलावातील पाणी पुरवठा करण्यासंदर्भातही सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. यावेळी युवा कार्यकर्ते गुलाब जाधव, विश्वनाथ राठोड, प्रल्हाद राठोड, पांडुरंग जाधव, गुरूनाथ राठोड, काशिनाथ जाधव, दगडू जाधव यासह नागरीक उपस्थित होते.