नळदुर्ग -: २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर हा पंधरवाडा हिंसचार विरोधी पंधरवाडा म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने कामधेनू बहुउद्देशीय सामाजिक संस्था फुलवाडी व सम्यक पुणे या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ‘बापांची शाळा’ हे अभियान तुळजापूर तालुक्यातील फुलवाडी, चिवरी उमरगा, येवती, आरळी, खुदावाडी, सराटी, नळदुर्ग व परिसरात राबविण्यात येणार असल्याची माहिती कामधेनू संस्थेचे सचिव बळीराम जेठे यांनी सांगितले.
या अभियानामध्ये पालकांच्या व मुलांच्या बैठका घेवून त्याना सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर गावात रॅली काढून मुलांच्या अधिकार्या संदर्भात समाजात जनजागृती करण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्र संघाने दिलेले मुलांचे अधिकार मुलांना मिळण्यासाठी वडिलांचा सहभाग कसा वाढेल, या अभियानात भर देण्यात येणार आहे. बर्याच वेळेला मुलांचे व वडिलांचे नाते दुरावत चालले आहे. एकमेकांचा संवाद कमी झालेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुलांच्या व पालकांच्या बैठका, चर्चासत्र व काही पोस्टरच्या मदतीने पालकांचा व मुलांचा संवाद वाढेल असा प्रयत्न केला जाणार आहे. मुलांचे अधिकार काय आहेत, ते कुठल्या पद्धतीने मुलांना मिळाले पाहिजे, याचेही सविस्तर मार्गदर्शन संस्थेच्यावतीने करण्यात येणार आहे.
या अभियानात सम्यक संस्थेचे आनंद पवार, आपलं घरचे व्यवस्थापक शिवाजी पोतदार, रचनात्मक संघर्ष समितीचे संजय लाडके, आधार सामाजिक संस्थेचे दयानंद काळुंके, राष्ट्र सेवा दलाचे रुपाली माने, संतोष बुरंगे आदीजण सहभागी होणार आहेत.