हाच तो अपघातग्रस्त ट्रक |
नळदुर्ग -: सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील अणदूर (ता. तुळजापूर) येथील बसस्थानकासमोर भरधाव ट्रकने मोटारसायकलस्वारास जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दोन युवक जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवार रोजी पावणे आठ वाजता घडली आहे. अपघात एवढा भीषण होता की मयत युवकाच्या अंगावरून ट्रक गेल्याने त्यांचे मृतदेह छन्नविछिन्न झाले होते. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे.
किरण शिवाजी आरगे (वय 19 वर्षे) व अतुल शिवाजी मुळे (वय 19 वर्षे) दोघे रा. चिवरी, ता. तुळजापूर असे अपघातात मरण पावलेल्या युवकांचे नावे आहेत. मोटारसायकल (क्रं. एम.एच. 13 ए.आर. 4405) यावर आरगे व मुळे हे दोघेजण चिवरी येथून अणदूर मार्गे नळदुर्गकडे जात असताना अणदूर बसस्थानकासमोर उमरग्याहून सोलापूरकडे जाणारा भरधाव ट्रक (क्रं. के.ए. 38 / 625) ने जोराची धडक दिली. ट्रकने मोटारसायकलस्वारास चिरडल्याने त्यात वरील दोघाचा करूण अंत झाला. या अपघातानंतर ट्रक घटनास्थळी सोडून चालक क्लिनरसह फरार झाला. हा अपघात घडताच पंचायत समिती सदस्य साहेबराव घुगे, राजकुमार आलुरे, शिवकुमार स्वामी, अतुल बारबाई यानी अपघातस्थळी जाऊन छन्नविछिन्न झालेले युवकांचे मृतदेह एकत्र गोळा करून अक्षरशः गाठोडे बांधून शवविच्छेदनासाठी अणदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. रात्री सव्वा अकराच्या दरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ. निलंगेकर यानी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. त्यानंतर किरण आरगे व अतुल मुळे यांच्या पार्थिवावर चिवरी येथे एकाच चितेवर अंतिम संस्कार करण्यात आले. या घटनेमुळे चिवरी गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी नळदुर्ग पोलिसांना या अपघाताची माहिती देताच महामार्ग पोलीसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. अपघातानंतर काही काळ झालेली वाहतुकीची कोंडी पोलिसांनी सोडविली. याप्रकरणी मनोज राम आरगे (वय 32 वर्षे, रा. चिवरी, ता. तुळजापूर, धंदा शेती) यानी पोलीसात फिर्याद दिल्यावरून वरील ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शेटकर हे करीत आहेत.