नळदुर्ग -: ऊसाला भाव वाढवून न दिल्यास शेतकरी संघटनेच्यावतीने यापुढे मराठवाड्यात आपले आंदोलन अधिक तीव्र करणार असून शासनाने ऊसाचा दर ठरविण्यासाठी कारखानदार व ऊसउत्पादक शेतक-यांची बैठक घेण्याची मागणी शेतकरी संघटनेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष रामजीवन बोंदर यांनी अणदूर (ता. तुळजापूर) येथे गुरूवार रोजी राष्ट्रीय महामार्गावरील रास्ता रोको आंदोलनाप्रसंगी केले.
ऊसाला भाव मिळावा, या व इतर मागणीसाठी गुरूवार दि.८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष रामजीवन बोंदर यांच्या नेतृत्वाखाली अणदूर येथील राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामजीवन बोंदर पुढे सांगितले, ऊसाला भाववाढ देणे ही शासनाची जबाबदारी असून शासन मात्र साखर कारखानदारांशी संगनमत करुन भाव वाढवून देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याची टीका केली. सध्या ऊस दरावरुन संपूर्ण राज्यात आंदोलन होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेतक-यांनी आपले आंदोलन अधिक तीव्र केले असून अनेक साखर कारखाने बंद पाडले आहेत. याच धर्तीवर शेतकरी संघटना यापुढे मराठवाड्यात आपले आंदोलन अधिक तीव्र करणार आहे. शासन मात्र कारखानदारांचा विचार करुन साखर उत्पादनाच्या खर्चावर ऊसाचा दर ठरवित आहे. मात्र शेतक-यांनी वर्षभर कष्ट करुन उत्पादीत केलेल्या ऊसाच्या खर्चाचा विचार हा दर ठरवताना शासन करत नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातील ऊसाचा दर ठरविण्यासाठी कारखानदार व ऊस उत्पादक शेतक-यांची बैठक घ्यावी अशी मागणी करुनही अद्याप अशी बैठक घेण्यात आली नाही. येत्या चार पाच दिवसात हि बैठक होवून ऊस दर ठरला नाही तर शेतकरी संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
एक तास चाललेल्या रास्ता रोको आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आंदोलनामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन राष्ट्रीय महामार्गावर दुतर्फा मोठ्या रांगा लागल्या होत्या. याप्रसंगी शेतकरी संघटनेचे अरविंद घोडके, किसान सेनेचे बाळकृष्ण घोडके, दिनकरराव कुलकर्णी, राजकुमार स्वामी, शिवाजी कांबळे, शिवकुमार स्वामी यांनीही आपल्या भाषणात शासन व कारखानदारावर कडाकडून टिका केली. शेतक-यासाठी होणा-या आंदोलनात शेतक-यांनी एकजुट होवून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पं.स.चे सदस्य साहेबराव घुगे यांनी केले. या आंदोलनानंतर शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने मंडळ अधिकारी माणिकराव पवार यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. या आंदोलनात शेतकरी तसेच सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पोलिस निरीक्षक मुबारक शेख व आर.पी.देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.