पुणे -: येथील सुब्रतो रॉय सहारा स्टेडियमवर झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने इंग्लंडवर पाच गड्यांनी विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. सामनावीर युवराजसिंग भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 बाद 157 धावा काढल्या. प्रत्युत्तरात भारताने 17.5 षटकांत 5 बाद 158 धावा काढून विजयश्री गाठली. पुढचा टी-20 सामना आता 22 डिसेंबर रोजी शनिवारी मुंबईत होणार आहे.

युवराज आला फॉर्मात
     कसोटीत संघातून वगळल्यानंतर टी-20 सामन्यात युवीने फॉर्म परत मिळवला. गोलंदाजीत 3 गडी बाद केल्यानंतर त्याने फलंदाजीत 21 चेंडूंत 38 धावा ठोकल्या.  युवीने 3 षटकार आणि 2 चौकार मारले. रैनाने 19 चेंडूंत 26 तर धोनीने 21 चेंडूंत नाबाद 24 धावा काढल्या. अजिंक्य रहाणेने 19 तर गंभीरने 16 धावांचे योगदान दिले. भारताला गंभीर-रहाणे यांनी 4.3 षटकांत 42 धावांची आक्रमक सलामी दिली. गंभीर 42 तर रहाणे 44 च्या स्कोअरवर बाद झाला. यानंतर युवराज आणि कोहली यांनी तिसर्‍या विकेटसाठी 49 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. युवीच्या आक्रमक फलंदाजीने सामना भारताच्या बाजूने झुकवला. अखेरीस कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैनाने टिकून फलंदाजी करताना विजय खेचून आणला.

हेल्सचे दमदार अर्धशतक
     तत्पूर्वी, इंग्लंडकडून सलामीवीर हेल्सने अर्धशतकी खेळी करताना अवघ्या 35 चेंडूंत 7 चौकार आणि 2 षटकारांसह 56 धावा ठोकल्या. भारताकडून युवराजसिंगने टिच्चून गोलंदाजी करताना इंग्लंडच्या तीन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. वेगवान गोलंदाज अशोक डिंडाने दोन गडी बाद केले. भारताने टॉस जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजीस बोलावले. इंग्लंडने 10.1 षटकांत 1 बाद 89 धावा ठोकून चांगली सुरुवात केली होती. मात्र, युवीच्या गोलंदाजीने इंग्लंडच्या फलंदाजांवर ब्रेक लावला. ल्यूक राइट (34), समित पटेल (24) आणि बटलर (33) यांनीही चांगला खेळ केला.

युवीचे शिकार (4-0-19-3)

1. ल्यूक राइट षटकार मारण्याच्या नादात लाँगआॅफवर रहाणेकरवी झेलबाद. (10.1 षटक.)
2.युवीच्या फिरकीला न समजल्याने ए. हेल्स बोल्ड झाला. (12.2 वे षटक.)
3. मोर्गन मिडआॅनवर अजिंक्य रहाणेकरवी झेलबाद झाला. (12.4 वे षटक.)

सामनावीर- युवराजसिंग

अशा धावा मोजल्या 
 भारतीय गोलंदाज
अशोक डिंडा : पहिल्याच षटकाच्या अखेरच्या दोन चेंडूंवर ए. हेल्सने सलग दोन चौकार मारले.
परविंदर अवाना : तिसर्‍या षटकात ए. हेल्सने दोन चौकार ठोकले.
रवींद्र जडेजा : पाचव्या षटकात हेल्सने एक षटकार आणि एक चौकार मारला.
पीयूष चावला : सातव्या षटकात ल्यूक राइटने मारले दोन चौकार आणि हेल्सने एक चौकार ठोकला.
विराट कोहली : आठव्या षटकात ल्यूक राइटने षटकार ठोकला.
आर. अश्विन : 18 व्या षटकात बटलर आणि समित पटेल यांनी प्रत्येकी एक षटकार मारला.

 इंग्लिश गोलंदाज
ब्रेसनन : दुसर्‍या षटकात अजिंक्य रहाणेने षटकार मारला आणि गौतम गंभीरने चौकार ठोकला.
डर्नबॅक : तिसर्‍या षटकात रहाणेने आणखी एक षटकार खेचला, गंभीरनेही चौकार मारला.
ब्रिग्स : आठव्या षटकात युवराजसिंगने दोन षटकार आणि एक चौकार ठोकला. 

 
Top