उस्मानाबाद : राष्ट्रीय पीक विमा योजना रब्बी हंगाम-2012-13 साठी पीक विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी कळविले आहे.
       पीक विमा ही योजना सर्व पीकांसाठी ऐच्छिक असून कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतक-यांनी विम्याचा हप्ता चलनाद्वारे बँकेत भरणे आवश्यक आहे. चालू हंगामात पीक कर्ज वितरण हे राष्ट्रीयकृत बँकांकडून होत असल्याने पीक विमा हप्ता राष्ट्रीयकृत बँकेतच भरावा असे आवाहन त्यांनी केले आहे. यासाठी ज्या पिकाचा विमा उतरावयाचा आहे त्याचा पीक पेरा, सातबारा आणि 8 अ चा उताऱ्यांसह नजिकच्या बँकेत हप्ता भरणे गरजेचे आहे. या योजनेतंर्गत अतिअल्प व अल्पभूधारकांना विमा हप्त्याच्या 10 टक्के सूट असून त्यांनी विमा हप्त्यावरील दराच्या 90 टक्के दराने भरणा करावयाचा आहे.
           रब्बी हंगाम -12-13 साठी बागायती व जिरायती गहू व ज्वारी , हरभरा,करडई,सुर्यफूल, रब्बी कांदा या पिकांच्या उंबरठा उत्पादनाच्या किंमतीपर्यंत व उंबरठा उत्पादनापेक्षा जादा किंमतीपर्यंत प्रति हेक्टरी दिलेल्या रक्कमेवर आणि दिलेल्या पीक विमा दराप्रमाणे पीक विमा हप्ता भरावयाचा असल्याचे कळविण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
 
Top