उस्मानाबाद : विविध विभागामार्फत राबविण्यात येत असणाऱ्या योजनांची माहिती ग्रामस्तरावर काम करणा-या घटकांना व्हावी यासाठी येथील जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने एकात्मिक प्रसिध्दी कार्यक्रमांतर्गत ग्रामसंवाद कार्यशाळेचे आयोजन केले आहे. मंगळवार, दि.11 डिसेंबर रोजी रायगड फंक्शन हॉल, औरंगाबाद रोड, उस्मानाबाद येथे ही कार्यशाळा होणार असून या कार्यशाळेचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ.के.एम.नागरगोजे यांच्या हस्ते सकाळी 10-30 वाजता होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल.हरिदास हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत.
       कृषी सहायक, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील आणि महिला बचत गट या ग्रामस्तरावर काम करणा-या उस्मानाबाद तालुक्यातील 100 प्रतिनिधींना यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. विविध विभागामार्फत राबविण्यात येत असणा-या योजनांची त्यांना माहिती व्हावी यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
         या कार्यशाळेत कृषी, पशुसंवर्धन, सामाजिक न्याय, आरोग्य, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ग्रामविकास अभियान, निर्मल भारत अभियान आदिंची माहिती दिली जाणार आहे. विशेषत: ग्रामपातळीवरील सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयुक्त असणाऱ्या वैयक्तीक लाभाच्या योजना या घटकांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहविण्याचा या कार्यशाळा आयोजनाचा उद्देश आहे. विविध विभाग प्रमुख आपल्या विभागातील महत्वपूर्ण योजनांची माहिती यात देणार आहेत. ग्रामस्तरावर काम करणाऱ्या या घटकांना स्वत:च्या विभागाव्यतिरिक्त इतर विभागांच्या योजनांची माहिती व्हावी हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे.
        कार्यशाळेचा समारोप व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम सायंकाळी 4-30 वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी, उस्मानाबाद यांनी दिली आहे. 

 
Top