नळदुर्ग -: तुळजापूर तालुक्‍यात डेंग्‍यूसदृश्‍य आजारामुळे ग्रामस्‍थांची झोप उडाली असतानाच  नांदुरी (ता. तुळजापूर) या गावात गॅस्‍ट्रोच्‍या साथीने डोके वर काढले असून आतापर्यंत 60 पेक्षा अधिक ग्रामस्‍थांना गॅस्‍ट्रोची लागण झाल्‍याने जिल्‍हा आरोग्‍य विभागात खळबळ उडाली असून सा‍थ आटोक्‍यात आणण्‍यासाठी व रूग्‍णांवर उपचाराकामी नांदुरी गावात आरोग्‍य विभागाची तीन पथके तैनात करण्‍यात आली आहे.
नांदुरी (ता. तुळजापूर) येथे गॅस्‍ट्रो सदृश्‍य आजाराने गुरुवार रोजी दहा पेक्षा अधिक रूग्‍ण आढळून आले होते. त्‍यानंतर शुक्रवार रोजी या आजाराच्‍या रूग्‍णात वाढ होऊन 65 च्‍या पुढे रूग्‍णांच्‍या संख्‍येत वाढ झाल्‍याचे आरोग्‍य खात्‍याच्‍या सुत्राकडून सांगण्‍यात आले. दरम्‍यान, या घटनेची माहिती मिळताच तात्‍काळ आरोग्‍य विभागाची पथके या गावात तैनात करण्‍यात आली आहे. त्‍याचबरोबर जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. आर.आर. हाश्‍मी, जि. प. अध्‍यक्ष डॉ. सुभाश व्‍हट्टे, जिल्‍हा साथरोग नियंत्रण विभागाचे डॉ. जयसिंह वीर, वैद्यकीय अधिकारी डॉ. गाडेकर, डॉ. बेलापट्टे यांनी नांदुरी येथे भेट देऊन परि‍स्थिती जाणून घेतली व आरोग्‍य कर्मचा-यांना सूचना दिल्‍या आहेत. आरोग्‍य कर्मचा-यानी गावातील पिण्‍याच्‍या पाण्‍याचे शुध्‍दीकरणाचे काम हाती घेतले आहे. मोठ्याप्रमाणावर गॅस्‍ट्रोची लागण झाल्‍याने जागा अपुरी पडत असल्‍यामुळे रूग्‍णांना उपचारासाठी ग्रामपंचायत इमारत व समाज मंदिरात याठिकाणी उपचार करण्‍यात येत आहे. तसेच चार रूग्‍णांची प्रकृती जास्‍त खालावल्‍याने त्‍यांना मंगरुळ येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रात दाखल करण्‍यात आले आहे. या ठिकाणी नेमण्‍यात आलेल्‍या प‍थकामध्‍ये तालुका आरोग्‍य अधिकरी, दोन वैद्यकीय अधिका-यासह नऊ आरोग्‍य कर्मचा-यांचा समावेश आहे. आरोग्‍य कर्मचा-यानी साथ आटोक्‍यात आणण्‍यासाठी प्रयत्‍न करीत आहेत. दरम्‍यान, नांदुरी येथील ग्रामस्‍थांना दोन ठिकाणावरून पाणीपुरवठा करण्‍यात येत आहे. जलवाहिनीला काही ठिकाणी गळती झाल्‍याने त्‍याद्वारे दुषित पाणी जाऊन गॅस्‍ट्रोची साथ पसरल्‍याचा प्राथमिक अंदाज जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. हाश्‍मी यांनी सांगितले.

 
Top