सोलापूर :- भारताचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या 29 डिसेंबर रोजी होणा-या सोलापूर जिल्ह्याच्या संभाव्य दौ-यामध्ये सर्व विभागाच्या अधिका-यांनी राजशिष्टाचार विभागाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे अशा सूचना विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी दिल्या.
     जिल्हाधिकारी कार्यालयात आज विभागीय आयुक्त आणि राजशिष्टाचार विभागाचे अधिकारी एस.व्ही. बिजुर यांच्या उपस्थितीत संभाव्य राष्ट्रपती दौ-याच्या नियोजनासंदर्भात सर्व विभागप्रमुखांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हाधिकारी गोकुळ मवारे, मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, उपायुक्त तुकाराम पवार, पोलीस आयुक्त प्रदीप रासकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेश प्रधान, महापालिका अजय सावरीकर, अप्पर जिल्हाधिकारी अशोक काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी पराग सोमण, पंढरपूर प्रांताधिकारी बाबासाहेब बेलदार, सोलापूर प्रांताधिकारी भारत वाघमारे उपस्थित होते.
    अधिका-यांना सूचना करताना विभागीय आयुक्त श्री. देशमुख म्हणाले की, कोणत्याही अधिका-याने राजशिष्टाचाराला प्राधान्य देऊन दिलेल्या कामाची विभागणी नियोजनपूर्वक करावी. तसेच या दौ-याचे यशस्वीरित्या नियोजन करण्याचे त्यांनी सांगितले.
    यावेळी सूचना देताना राजशिष्टाचार विभागाचे श्री. बिजुर म्हणाले की, राष्ट्रपती ज्या मार्गाने जाणार आहेत, त्या मार्गावरील रस्ते दुरुस्त करण्यात यावेत, या मार्गावरील अतिक्रमण काढण्यात यावे, तसेच दौ-यासंदर्भातील सर्व संबंधित कामे येत्या 24 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात यावीत असेही ते म्हणाले. या आढावा बैठकीमध्ये प्रामुख्याने रस्ता दुरुस्ती, अतिक्रमण, सुरक्षा व्यवस्था, हेलिपॅड, वैद्यकीय पथक, दूरसंचार सुविधा, विविध विश्रामगृह तसेच वीजपुरवठा आदीबाबतही बिज्जुर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या बैठकीस तात्या कोठे, बिपीन पटेल, डॉ. माधवी रायते यांच्यासह सर्व विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.
 
Top