नळदुर्ग -  श्री तुळजाभवानी साखर कारखान्‍यातील भंगार विक्री करण्‍यापूर्वी कागदपत्राची पूर्तता करुन  सभासदांची सभा घेऊन व त्‍या सभेत ठराव घेऊनच भंगार विक्री करावी अशी मागणी करून भंगार विक्रीसह इतर विषयावर सविस्‍तर चर्चा सभेत घडवून आणावी, तसेच कायदेशीर बाबीची पूर्तता केल्‍याची खात्री होईपर्यंत कारखान्‍यातील भंगाराची विक्री करु नये अन्‍यथा अनुचित प्रकार घडल्‍यास त्‍यास कार्यकारी संचालक जबाबदार राहतील, असे निवेदन नळदुर्ग पोलीस ठाण्‍याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना सभासद व शेतकरी संघटनेच्‍यावतीने देण्‍यात आले.
      निवेदनात नमूद केले आहे की, गेल्‍या काही दिवसांपासून श्री तुळजाभवानी शेतकरी साखर कारखान्‍यातील लोखंड भंगार विक्री बेकायदेशीरित्‍या सुरु असून हे विचारण्‍यासाठी दि. 27 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता माहिती मिळाल्‍यानंतर घटनास्‍थळी नऊ वाजता तुळजाभवानी कारखान्‍यावर गेले असता गेटवरती भंगार भरणा-या दोन ट्रक आढळून आल्‍या. त्‍यानंतर आम्‍ही कार्यकारी संचालक यांची भेट घेतली असत चार ट्रक लोखंड भंगार भरुन गेल्‍याची माहिती  दिली. यावेळी त्‍यांना भंगार विक्रीच्‍या कागदपत्राची माहिती विचारली असता उडवाउडवीचे उत्‍तर मिळाले. भंगार विक्री कोणत्‍या आधारे कार्यकारी संचालक करतात, याची सर्व कागदपत्राची पुर्तता करुन सभासदाची सभा घेऊन त्‍या सभेत ठराव होवूनच रितसर भंगार विक्री करावी, ही आमची प्रमुख मागणी आहे. सर्वसाधारण सभा घेऊन भंगार विक्री तसेच इतर विषयावरती सविस्‍तर चर्चा घडवून आणावी. सर्वसाधारण सभा न घेता किंवा कायदेशीर कागदपत्राची पुर्तता, त्‍याचप्रमाणे दिेलेल्‍या सर्व कागदपत्राची पर्तता केल्‍यानंतर शहनिशा होईपर्यंत भंगार विक्री करु नये, अन्‍यथा अनुचित प्रकार घडल्‍यास कार्यकारी संचालक हेच जबाबदार राहतील, असेही निवेदनात म्‍हटले आहे.
या निवेदनावर अरविंद बाबुराव घोडके, आप्‍पासाहेब शेटे, अच्‍युत आलुरे, बसवराज मुळे, राजाराम गोवे, अनिल कुलकर्णी, गुरूनाथ मिटकर, सदाशिव हागलगुंडे, दत्‍ता जाधव, बाळु हागलगुंडे, संजू घुगे, परमेश्‍वर काळे, महमंद शेख, नागनाथ जाधव, संजय घुगे, शिवराज कुताडे, योगीनाथ तोग्‍गी आदींच्‍या स्‍वाक्ष-या आहेत.
         दरम्‍यान याप्रकरणी कारखान्‍याचे कार्यकारी संचालक विकास भोसले यांच्‍याशी संपर्क साधले असता, तुळजाभवानी साखर कारखान्‍यातील भंगारचा माल ट्रकमध्‍ये भरण्‍यापूर्वी कायदेशीर आवश्‍यक त्‍या कागदपत्राची पूर्तता करुनच कारखान्‍याबाहेर भंगार पाठविण्‍यात येतो. सभासद शेतकरी यांची कारखान्‍याकडून दिशाभूल केली जात नाही, असे सांगितले.
 
Top