नळदुर्ग -: वन मंत्रालय भारत सरकार, बायफ संस्‍था पुणे व आधार सामाजिक संस्‍था इटकळ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने पर्यावरण जाणीव जागृती कार्यक्रमानिमित्‍त आधार संस्‍थेच्‍या वतीने मौजे चिकुंद्रा (ता. तुळजापूर) येथे स्‍थानिक बी-बियाणांचे प्रदर्शन दाखविण्‍यात आले.
      पर्यावरण व स्‍थानिक बी-बियाणांचा संबंध कसा आहे, याविषयी प्रदर्शनामध्‍ये परिवर्तन सामाजिक संस्‍थेचे सचिव मारूती बनसोडे यांनी मार्गदर्शन केले. तर ज्ञानकिरण सामाजिक संस्‍थेचे अध्‍यक्ष भैरवनाथ कानडे यांनी पर्यावरणाचा होत असलेला -हास व त्‍यावर प्रतिबंधात्‍मक उपाययोजना सुचवली.
       प्रदशर्नामध्‍ये माहिती देताना मारुती बनसोडे म्‍हणाले की, स्‍थानिक बी-बियाणे हे वरचेवर लोप पावत चालले आहेत. रासायनिक खताच्‍या मा-यामुळे सध्‍याचे पीक हे मानवास हानीकारक आहे. अशा अन्‍नाने मानवास अनेक व्‍याधी, स्‍थानिक बियाणाचे संवर्धन करावे, असे त्‍यानी शेवटी सांगितले.
      आधार सामाजिक संस्‍थेचे सचिव दयानंद काळुंके यांनी आपल्‍या सूत्रसंचालनासह पर्यावरणाच्‍या संदर्भात ‘‘माझ्या अंगणात झाडाचं लय कामरं’’, ‘‘मिरची बाईचं लगीन झाली गवार करवली’’ सह अनेक मनोरंजनात्‍मक गायन करुन विद्यार्थ्‍यांना पर्यावरणाचे महत्‍त्‍व पटवून दिले.
      या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी भानुदास कदम हे होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणून नितीन शिंदे, उस्‍मानाबाद शिक्षक संघटनेचे उपाध्‍यक्ष एन.एस. इटकरी, गोविंद कराळे, भालके उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक भैरवनाथ कानडे यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्‍वर गरड यांनी केले. या कार्यक्रमाच्‍या प्रदर्शनाचा लाभ शेकडो विद्यार्थी, गावक-यांनी घेतला.
 
Top