सोलापूर :- दिल्ली येथील सामुहिक बलात्कारातील पीडीत मुलीच्या मृत्युबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करुन राष्ट्रपती श्री.प्रणव मुखर्जी यांनी अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी काळजी घेतली पाहिजे असे आवाहन केले.
      सोलापूर येथे डॉ. निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठान सभागृहाचा लोकार्पण समारंभ आज त्यांच्या हस्ते  झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल श्री. के. शंकरनारायणन हे होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री श्री. गुलाम नवी आझाद, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री श्रीमती कुमारी सेलजा,  वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय मंत्री मधुकरराव चव्हाण, पालकमंत्री श्री. लक्ष्मण ढोबळे उपस्थित होते.
    या प्रसंगी बोलतांना राष्ट्रपती म्हणाले की, महिलांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे, महिला सुरक्षीत राहिल्या पाहिजेत, स्त्रीला आई व बहिणीच्या नात्याने सन्मानाने वागविले पाहिजे यासाठी समाजातील सर्व घटकांनी त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.
     शरिराला जसे अन्न लागते तसे बुध्दीलाही खाद्य लागते. ते खाद्य देण्यासाठी सोलापूरातील कलावंत, खेळाडू, वक्ते यांना उपयोग होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. निर्मलकुमार फडकुले हे सोलापूरचे ज्येष्ठ विचारवंत व राज्यातले नामवंत साहित्यीक म्हणून त्यांचे योगदान महत्वपूर्ण होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या पुढाकाराने या अत्याधुनिक सभागृहाची उभारणी करण्यात आली आहे. या सभागृहाचे लोकार्पण झाल्याचे त्यांनी जाहीर केले.  
     सोलापूरला अनेक शतकांची, श्रेष्ठ मूल्यांची, धाडसाची व संस्कृतीची परंपरा आहे. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या लढ्यात सोलापूर शहराचे योगदान महत्वपूर्ण राहिले असल्याचे गौरवपूर्ण उल्लेख राष्ट्रपती महोदयांनी केला.
    मुख्यमंत्री श्री. पथ्वीराज चव्हाण म्हणाले की, सोलापूरच्या साहित्यीक व सांस्कृतिक जीवनात डॉ. निर्मलकुमार  फडकुले यांची महत्वाची भूमिका होती. संत वाड्.मयावर त्यांनी केलेले योगदान महत्वपूर्ण होते. सांस्कृतिक काया्रला त्यांनी वाहून घेतले होते. त्यांच्या नावाने उभारण्यात आलेले हे सभागृह सोलापूरच्या वैभवात भर टाकणारे आहे असे प्रतिपादन केले.
    डॉ. निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. रामदास फुटाणे व सचिव श्री. विष्णुपंत कोठे यांनर मान्यवरांचा सत्कार केला. समारंभाला महापौर श्रीमती अलका राठोड, आ. प्रणिती शिंदे, श्रीमती मंदाकिनी फडकुले, प्रतिष्ठीत नागरिक व मान्यवर उपस्थित होते.
 
Top