सोलापूर :- दिल्ली येथील सामुहिक बलात्कारातील पीडीत मुलीच्या मृत्युच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व जनतेने शांतता राखाण्याचे आवाहन महामहिम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केले.
    सोलापूर जिल्ह्यातील कुंभारी येथील  अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन केंद्राचे उदघाटन राष्ट्रपती महोदयांच हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री गुलाम नबी आझाद,
पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री मधुकरराव चव्हाण, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री कुमारी सेलजा, पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे, वन, मदत व पुनर्वसन मंत्री डॉ. पतंगराव कदम,  उपस्थित होते.
    आपल्या भाषणात पीडीत तरुणीच्या मृत्युबद्दल शोक व्यक्त करुन राष्ट्रपती म्हणाले की, झालेली घटना अत्यंत दु:खद व खेदपूर्ण आहे. त्या मुलीचे प्राण वाचविण्यासाठी सरकारकडुन सर्व शक्य ते प्रयत्न करण्यात आले.तीच्या कुटुंबीयांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे.
    आपल्या संस्कृतित स्त्रियांना देवी, माता, बहिण, पत्नी या सह विविध रुपात बघितले जाते. त्यांना समाजात निर्भय वातावरणात राहता यावे यासाठी अशा घृणास्पद घटना घडु नयेत याची दक्षता घेतली पाहिजे. असे आवाहन महामहिम राष्ट्रपती यांनी केले.
    परदेशातील सर्व अत्याधुनिक आरोग्य सुविधा देशात उपलब्ध होण्यासाठी येत्या पंचवार्षिक योजनेत आरोग्य विभागासाठी असणारी आर्थिक तरतूद 300 टक्क्यांनी वाढविण्यात आली आहे. सद्या देशात लोकसंख्येच्या तुलनेत डॉक्टर्स, परिचारीका, वैद्यकीय मनुष्यबळाचे प्रमाण कमी आहे. परंतू आगामी वर्षात शासनाच्या प्रयत्नामुळे हे नक्कीच वाढेल असा विश्वास राष्ट्रपती महोदयांनी व्यक्त केला.
    ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी शासन विविध आरोग्य योजना राबवित आहे. सामाजिक व आर्थिक विकासामध्ये चांगल्या आरोग्यासह शरीर व मन सुदृढ राहावे म्हणून ग्रामीण वै'द्यकीय पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. देशातील जनतेच्या आरोग्य संवर्धनासाठी डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल्सची अधिक आवश्यकता असून या साठी वैद्यकीय महाविद्यालये आणि त्यांची प्रवेश क्षमता वाढवून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स उभारण्यात येत असल्याचेही राष्ट्रपती महोदय म्हणाले.
     भारत हा तरुणांचा देश असून त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त क्षमता आहे. त्या क्षमतांचा वापर चांगल्या पध्दतीने व्हायला पाहिजे. देशात कितीही बिकट परिस्थिती निर्माण झाली तरी भगवान गौतम बुध्दांच्या अहिंसक आणि शांततेच्या मार्गाचे अनुकरण करण्याची अपेक्षा राष्ट्रपती महोदयांनी व्यक्त केली.
    मुख्यमंत्री चव्हाण आपल्या भाषणात म्हणाले की, महाराष्ट्रात आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्यदायी योजनेसारखा पथदर्शी  प्रकल्प प्रयोगात्मकरित्या आठ जिल्ह्यात यशस्वीरित्या राबविण्यात आला आहे. आता तो संबंध राज्यभर राबविण्यात येणार असून या योजनेअंतर्गत 23 हजार शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
    राज्यात लवकरच शंभर मोबाईल रुग्णवाहीका उपलब्ध करुन देण्याची क्रांतीकारी योजना कार्यान्वित होत आहे. यामध्ये रुग्णवाहिका कॉलसेंटरला फोन केल्यास रुग्णाच्या सेवेत ती रुग्णवाहिका त्वरीत उपलब्ध होणार आहे. सद्या नवीन आठ वैद्यकीय महाविद्यालयांना शासनाने परवानगी दिली असून भविष्यात प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचा शासनाचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.
    सद्या राज्य भीषण दुष्काळाशी सामना करीत असून दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन सर्व प्रकारे प्रयत्न करीत आहे. या दुष्काळामध्ये पाणी टंचाईला खुप मोठ्या प्रमाणवर तोंड द्यावे लागत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी शासन सर्व ताकत पणाला लावील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. 
    केंद्रीय आरोग्यमंत्री आझाद यांनी युपीए सरकारने ग्रामीण भागातील 75 टक्के लोकांच्या आरोग्यसेवेसाठी अधिकाधिक लक्ष केंद्रीत केल्याचे सांगितले. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत राज्यांमध्ये 90 हजार कोटी रुपये वैद्यकीय सेवेसाठी खर्च करण्यात आल्याचे सांगितले. तसेच राज्यांमधील वैद्यकीय सुविधांच्या सक्षमीकरणासाठी 43.50 हजार कोटी दिल्याचा उल्लेखही त्यांनी केला. गेल्या तीन वर्षापासून भारत सरकार वैद्यकीय क्षेत्रात क्रातीकारी बदल घडविण्यासाठी ठोस पावले उचलत असून त्या अंतर्गत वैद्यकीय पदवी प्रवेश क्षमतेच्या संख्येत 40 टक्के आणि पदव्युत्तर पदवी प्रवेश क्षमतेत 80 टक्के वाढ केली आहे. आगामी काळात हीच वाढ अनुक्रमे 50 व 100 टक्के करण्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
    कार्यक्रमास महापौर अलका राठोड, आ. प्रणिती शिंदे, आ. सिद्रामप्पा पाटील, माजीमंत्री आनंदराव देवकते, माजी गृहराज्य मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, एम. एम. पटेल पब्लिक चॅरीटेबल ट्रस्टचे बिपीन पटेल, अधिष्ठाता डॉ. माधवी रायते यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
 
Top