नळदुर्ग -: जिल्ह्यातील पाणलोट प्रकल्प राबविण्यात येत असलेल्या गावातील शेतक-यांचया जीवनामध्ये या पाणलोट विकास प्रकल्पामुळे त्यांचे जीवनमान उंचावेल व आपल्या जिल्ह्यातील शेतकरी सुखी व समृध्द होईल, असे मत परिवर्तन सामाजिक संस्थेचे सचिव मारूती बनसोडे यांनी मांडले.
    मौजे दहिफळ, गौर (ता. कळंब) या दोन गावात एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत शेतकरी व महिलांसाठी आयोजित केलेल्या प्रकल्प परिचय प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मौजे दहिफळ येथे 56 महिला व 60 पुरूष सहभागी झाले होते. तर गौर येथे 70 महिला व 80 पुरूष या प्रशिक्षण शिबीरात सहभागी झाले होते. पुढील पाच वर्षात या गावात तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत प्रत्यक्ष जमिनीवर उपचाराचे काम होणार आहे. हा प्रकल्प गावक-यांना समजावून सांगण्यासाठी यशदा पुणे यांच्याकडून प्रकल्प प्रशिक्षण संस्था म्हणून नळदुर्ग येथील परिवर्तन सामाजिक संस्थेची निवड आय.डब्ल्यू.एम.पी. क्लस्टर नं. 13 मध्ये निवड केली आहे. संस्थेकडून सध्या दहिफळ, गौर, श्ोलगाव (दि.), भोसा, सातेफळ, बरमाचीवाडी या सहा गावात जाणीव जागृतीचा कार्यक्रम पार पडला असून सध्या परिचय प्रशिक्षणास सुरूवात झाली आहे. त्यापैकी दहिफळ आणि गौर या दोन गावची प्रशिक्षणे संपन्न झालेली आहे. यानंतर उर्वरीत गावात दि. 16 डिसेंबर पर्यंत प्रशिक्षणे पार पडणार आहे, अशी माहिती परिवर्तन सामाजिक संस्थेकडून देण्यात आली.

* विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवावा : मारूती बनसोडे
 नळदुर्ग -: विज्ञानाची सृष्टी आली पण वैज्ञानिक दृष्टी समाजात रूजलेली दिसत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांने स्वतःमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवावा व समाजात घडणा-या प्रत्येक घटनेमागे काय कार्यकारण भाव आहे, हा तपासावा तरच ख-या अर्थाने आपण विज्ञान युगात वावरत आहोत याची जाणीव होईल, असे प्रतिपादन परिवर्तन सामाजिक संस्थेचे सचिव मारूती बनसोडे यांनी केले.
    दि. 8 डिसेंबर रोजी मौजे दहिफळ (ता. कळंब) येथील जि.प. प्रशालामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन या विषायावर बनसोडे हे व्याख्यान देत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक राठोड हे होते. शाळेतील इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्याख्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न उत्तराचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांतून चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी खांडेकर, फाटक, मुंढे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले व शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
 
Top