उस्‍मानाबाद -: पाणलोट विकास प्रकल्‍पामध्‍ये महिलांनी पुढाकार घ्‍यावा, ही योजना आपल्‍या गावात यशस्‍वी करावी, असे आवाहन परिवर्तन सामाजिक संस्‍थेचे सचिव मारूती बनसोडे यांनी महिलांना मार्गदर्शन करताना केले.
    उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील 220 गावामध्‍ये एकात्मिक पाणलोट व्‍यवस्‍थापन कार्यक्रमांतर्गत (आय. डब्‍ल्‍यू. एमपी ) पाणलोट विकासाची कामे होत आहेत. यामध्‍ये क्‍लस्‍टर नं. 13 मध्‍ये दहिफळ, गौर, शेलगांव (दि), भोसा, सातेफळ, बरमाचीवाडी या सहा गावासाठी सध्‍या परिचय प्रशिक्षणे चालू असून प्रत्‍येक गावातील शेतकरी, बचत गटातील महिला यांना प्रकल्‍पाची माहिती देण्‍यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक पाणलोट व्‍यवस्‍थापन जनजागृती अभियानांतर्गत जाणीव जागृती, परिचय प्रशिक्षणे, वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा पुणे, एकात्मिक पाणलोट व्‍यवस्‍थापन केंद्र यशदा पुणे, तालुका कृषी अधिकारी कार्यालय कळंब व परिवर्तन सामाजिक संस्‍था नळदुर्ग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने घेण्‍यात येत असून दि. 15 डिसेंबर रोजी मौजे बरमाचीवाडी (ता. कळंब) येथे महिलासाठी परिचय प्रशिक्षण आयोजित करण्‍यात आले होते. या कार्यक्रमासाठी गावातील महिलांचा मोठ्याप्रमाणात सहभाग होता. या कार्यक्रमास गावचे सरपंच पांडुरंग महाजन, पाणलोट समितीचे सदस्‍य संजय बोराडे हे उपस्थित होते. कार्यक्रमामध्‍ये पाणलोट विकासातून महिलांना देण्‍यात येणा-या प्रशिक्षणासंदर्भात माहिती देण्‍यात आली. गावातील लोकांचा सहभाग आवश्‍यक आहे. तरच ही योजना गावात राबवली जाणार असून गावाचा ख-या अर्थाने विकास होण्‍यासाठी या योजनेचा जास्‍तीत जास्‍त लोकांनी लाभ घ्‍यावा, असेही शेवटी सांगितले. यावेळी सर्वांचे आभार आण्‍णा सातपुते यांनी मानले.
 
Top