उस्मानाबाद : विविध विभागामार्फत राबविण्यात येत असणाऱ्या योजनांची माहिती तुळजापूर तालुक्यातील ग्रामस्तरावर काम करणाऱ्या घटकांना व्हावी यासाठी येथील जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने ग्रामसंवाद कार्यशाळेचे आयोजन केले आहे. शुक्रवार, दि.14 डिसेंबर रोजी टाटा सामाजिक विज्ञान संस्था (अपसिंगा रोड), तुळजापूर येथे ही कार्यशाळा होणार असून या कार्यशाळेचे उदघाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल.हरिदास यांच्या हस्ते सकाळी 10-30 वाजता होणार आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागाचे संचालक राधाकृष्ण मुळी आणि तुळजापूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
       कृषी सहायक, आरोग्य सेवक, ग्रामसेवक, तलाठी आणि  पोलीस पाटील या ग्रामस्तरावर काम करणा-या तुळजापूर तालुक्यातील 100 प्रतिनिधींना यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य, ग्रामविकास अभियान, निर्मल भारत अभियान आदिंची माहिती दिली जाणार आहे. ग्रामस्तरावर काम करणाऱ्या या घटकांना स्वत:च्या विभागांव्यतिरिक्त इतर विभागांच्या योजनांची माहिती व्हावी हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे.
     यावेळी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने पाणीव्यवस्थापन तसेच पाणी बचतीसाठी केलेल्या विविध प्रयोगांची प्रत्यक्ष पाहणी करुन माहिती दिली जाणार आहे. तसेच संबंधितांना संवाद कौशल्य या विषयावर या संस्थेचे डॉ. बी. काजी हे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेचा समारोप व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम सायंकाळी 4-30 वाजता उस्मानाबादचे उपविभागीय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी, उस्मानाबाद यांनी दिली आहे.
 
Top