मुंबई -: नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालयाने 21 जुलै, 2012 रोजी वाशी येथील 6 गोदामांवर धाडी टाकून अवैध साठवणूक केलेल्या जीवनावश्यक वस्तूंचा साठा सिलबंद केला होता. याबाबत संबंधित साठा मालकांच्या सुनावण्याही घेण्यात आल्या होत्या. एकूण 100 साठा मालकांपैकी 67 साठा मालकांनी नियमानुसार साठवणूक केल्याचे आढळून आल्याने त्यांचा साठा मुक्त करण्यात आला तर, उर्वरित 33 साठा मालकांनी विना परवानगी अवैध साठवूणक केल्याचे आढळून आल्याने त्यांचा साठा शासन जमा करण्यात आला व तो वैध परवानाधारकास प्रचलीत दराने विक्री करुन त्याची रक्कम शासन जमा करण्यात आली.
24 साठा मालकांनी याबाबत उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली असून यावर अद्याप कोणतीही सुनावणी झालेली नाही. नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालयाने कार्यवाही नियमाप्रमाणे केली आहे. याचिकेचा संपाशी काहीही संबंध नसताना ग्रोमा या संस्थेचे पदाधिकारी वाशी येथील घाऊक व्यापाऱ्यांची तसेच सामान्य नागरिकांची दिशाभूल करीत आहेत. याबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही कार्यालयाने केलेल्या कार्यवाहीच्या निषेधार्थ मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशी, नवी मुंबई येथील मार्केट 1 व 2 मधील अन्न धान्य व कडधान्याचे घाऊक व्यापारी यांनी 26 नोव्हेंबर पासून संप पुकारला आहे.
वाशी येथील घाऊक बाजार पेठ वगळता ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, भिवंडी, ठाणे आदी विभागातील घाऊक व्यापार सुरळीत सुरु आहे. यामुळे मुंबई शहर व इतर विभागात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरु असून भाववाढ झालेली नाही, असे नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांनी कळविले आहे.