मुंबई -: दशावतार या कोकणातील पारंपरिक लोककलेच्या जतन व संवर्धनासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालायातर्फे दिनांक 2 ते 8 डिसेंबर 2012 या  कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे येथील एस.टी स्टँड जवळील मैदानात दशावतारी नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 
  या महोत्सवाचे उद्घाटन उद्या रविवार दिनांक 2 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता उद्योग मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते व सांस्कृतिक कार्य मंत्री संजय देवतळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी खासदार डॉ. निलेश राणे, आमदार सर्वश्री प्रमोद जठार, दिपक केसरकर, विजय सावंत उपस्थित राहणार आहेत. 
  या महोत्सवात दशावतारी मंडळे रामायण व महाभारत या पौराणिक कथानकांवर आधार‍ित नाटके सादर करणार आहेत.  नाईक मोचेमाडकर दशावतारी नाट्यमंडळ (वेंगुर्ला), भालचंद्र दशावतारी नाट्यमंडळ (हळवळ), वालावलकर दशावतारी नाट्यमंडळ (ओसरगांव), आजगांवकर दशावतारी नाट्यमंडळ (आजगांव), स्वयंभू दशावतारी नाट्यमंडळ (पंगरण), खानोलकर दशावतारी नाट्यमंडळ (खानोली) ही दशावतारी नाट्यमंडळे सहभागी होणार आहेत. 
  अनेक वर्षांच्या लोक परंपरेनुसार दशावतारी नाटकाचे सादरीकरण करताना स्त्री भूमिका पुरुष कलावंतच करीत असत. या परंपरेला छेद देत महिला दशावतारी नाट्यमंडळ सावंतवाडी या संस्थेकडून प्रथमच सर्व महिला कलाकार सहभागी होत असून पुरुष कलावंतांच्या भूमिका देखील स्त्री कलावंत करणार आहेत. या पुरोगामी विचाराच्या महिला दशावतारी नाट्यमंडळाचे सादरीकरण हे या वर्षाच्या दशावतारी नाट्य महोत्सवाचे खास वैशिष्ट्य असेल. 
  या महोत्सवास विनामूल्य प्रवेश असून रसिक प्रेक्षकांनी या पारंपरिक लोककलेला भरभरुन प्रतिसाद द्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक आशुतोष घोरपडे यांनी केले आहे.

 
Top