नळदुर्ग -: तुळजापूर तालुक्‍यातील बोळेगाव व शिरगापूर या दोन गावच्‍या वेगवेगळ्या ग्रामपंचायत निवडणुकीत दोन महिलाना मतदारानी वेगवेगळ्या दोन वॉर्डात प्रचंड मतानी विजयी केले होते. त्‍यानंतर दोन जागेपैकी एका जागेच्‍या सदस्‍यत्‍वाचा राजीनामा मुदतीत न दिल्‍यामुळे दोन्‍ही महिला सदस्‍यांचे सदस्‍यपद रद्द करण्‍यात आले. विशेषतः बोळेगाव येथील महिलेची सरपंचपदी निवड झाली होती. तर शिरगापूर येथील महिला सदस्‍य सरपंचपदाच्‍या दावेदार होत्‍या. मात्र या दोन्‍ही महिला सदस्‍यांचे सदस्‍यत्‍व रद्द झाल्‍यामुळे त्‍यांना सरपंचपदावर पाणी सोडावे लागले. या घटनेची तुळजापूर तालुक्‍यात राजकीय वर्तुळामध्‍ये जोरदार चर्चा होत आहे.
कोंडाबाई बाबू खंदारे (बोळेगाव, ता. तुळजापूर), महादेवी गुरूनाथ सूळ (शिरगापूर, ता. तुळजापूर) असे ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रं. 1 व 3 मधून प्रचंड मतानी विजयी झालेल्‍या व त्‍यानंतर सदस्‍यत्‍व रद्द होऊन सरपंचपद हुकलेल्‍या महिलांचे नाव आहे. यातील बोळेगाव ग्रामपंचायतच्‍या सात सदस्‍यांना निवडुन देण्‍यासाठी तीन वॉर्डात निवडणुक घेण्‍यात आली होती. या निवडणुकीत कोंडाबाई बाबू खंदारे यांनी ग्रामपंचायतच्‍या वार्ड क्र. 1 व 3 मधून निवडणुक लढविली होती. या निवडणुकीत दोन्‍ही ठिकाणी त्‍या निवडून आल्‍या. एकापेक्षा जास्‍त वार्डातून विजयी झाल्‍यामुळे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील तरतुद कलम 13 (अ) अन्‍वये श्रीमती कोंडाबई खंदारे यांनी सात दिवसाच्‍या आत एका पदाचा राजीनामा देणे गरजेचे होते. मात्र कोंडाबई खंदारे यांनी एका पदाचा राजीनामा दि. 26 नोव्‍हेंबर रोजी दाखल केला होता. मात्र राजीनामा देण्‍याची मुदत संपून गेल्‍यामुळे निवडणुक विभागाने त्‍यांचे दोन्‍ही ठिकाणचे सदस्‍यत्‍व रद्द केले. विशेष म्‍हणजे दि. 25 नोव्‍हेंबर रोजी कोंडाबाई खंदारे यांची सरपंचपदी निवड झाली होती. मात्र आता दोन्‍हीही सदस्‍यत्‍व रद्द झाल्‍याने श्रीमती खंदारे यांना सरपंचपदावरही पाणी सोडावे लागले आहे. निवडणुक नियमाची माहिती नसल्‍यामुळे निवडून येवूनही आपले सदस्‍यत्‍व गमवावे लागले आहे. 
असाच प्रकार शिरगापूर येथे घडले आहे. येथील महादेवी गुरुनाथ सूळ यानी प्रभाग क्रं. 1 व 3 मधून निवडणुक लढविली होती. या निवडणुकीत त्‍या विजयी झाल्‍या. त्‍यानी 29 ऑक्‍टोबर पर्यंत कोणत्‍याही एका वॉर्डातील पदाचा राजीनामा देणे गरजेचे होते. त्‍याचबरोबर त्‍यांची सरपंचपदी निवड होणार म्‍हणून ग्रामस्‍थानी मोठी जय्यत तयारी केली होती. परंतु त्‍यांनी दोन पैकी एका जागेवरच्‍या सदस्‍यपदाचा राजीनामा न दिल्‍यामुळे त्‍याना दोन्‍ही जागेवरील सदस्‍यपदावरुन बडतर्फ करण्‍यात आले. त्‍यामुळे त्‍यांनाही वरीलप्रमाणे सदस्‍यासह सरपंच पदावर विराजमान होता आले नाही. याबाबत ग्रामस्‍थात उलटसुलट चर्चा होत आहे.

 
Top