मुंबई -: भारतात नैसर्गिक साधन संपदेची कमतरता आहे मात्र बौद्धिक संपदा आणि कुशल मनुष्यबळाच्या आधारे आपण निश्चितच महासत्ता बनू शकतो, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. विधानपरिषद सभागृहात आयोजित 42 व्या राष्ट्रकुल संसदीय अभ्यासवर्गाच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते.
     यावेळी व्यासपीठावर विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, विधानसभा उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके, संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
    मुख्यमंत्री पुढे म्हणाले जागतिक महासत्ता होण्यासाठी आर्थिक संदर्भ महत्त्वाचे आहेत. अर्थव्यवस्था मजबूत झाल्याशिवाय विकासाचे स्वप्न पाहता येत नाही. आपल्या देशात नैसर्गिक साधनसंपतीचा अभाव आहे. मात्र या अभावावर मात करु शकणारी बौद्धिक संपदा ही मोठी शक्ती आपल्याकडे आहे. तिचा योग्य वापर आपणास करावा लागेल. यासाठी देशातील शिक्षण व्यवस्था, संशोधन प्रणाली यांची गुणवत्ता वाढायला हवी. जागतिक दर्जाचे स्पर्धात्मक शिक्षण देण्यासाठी आपल्या शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन घडवून आणायला हवे. कारण या शिक्षण व्यवस्थेतून निर्माण होणारे कुशल मनुष्यबळ हेच भविष्यातील आपले सामर्थ्यस्थळ असणार आहे. ज्ञानाधारित अर्थव्यवस्था हेच आपले उद्दिष्ट असायला हवे.
    आज देशाची अर्थव्यवस्था अनेक संकटांशी सामना करीत मार्गक्रमण करीत आहे. आपण मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून आहोत. तेलजन्य पदार्थांच्या आयातीसाठी मोठ्या प्रमाणात परकीय चलन खर्च होत असते. जागतिक बाजारपेठेत तेलाचे भाव वाढले की त्याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर आणि विकासकामांवर होतो. आर्थिक स्थैर्यासाठी परकीय चलनाचा ओघ सुरु राहणे आवश्यक आहे. यादृष्टीने थेट परकीय गुंतवणूक अतिशय महत्त्वाची आहे. या संदर्भातली आपली पारंपरिक मानसिकता बदलायला हवी. कारण परकीय चलन नसेल तर अर्थव्यवस्था कोलमडून पडायला वेळ लागणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
    प्रशासन चालविताना अनेक कटू निर्णय घ्यावे लागतात. हा वस्तुनिष्ठ राजकारणाचा भाग आहे. निव्वळ सवंग लोकप्रियतेसाठी घेतले जाणारे निर्णय आर्थिक संकटाकडे घेऊन जातात. प्रत्येक गोष्टीवर दिल्या जाणाऱ्या अनुदानास आळा बसायला हवा. सरकारला हे परवडणारे आहे का, याचाही विचार व्हायला हवा. यासाठी समाजात किमान आर्थिक साक्षरता वाढायला हवी, असा आशावादही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
    यावेळी विधानपरिषद सभापती शिवाजीराव देशमुख व विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी आपल्या मनोगतातून उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विधानपरिषद सदस्य हेमंत टकले यांनी केले तर, विधानसभा उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके यांनी आभार मानले. यावेळी दोन्ही सभागृहातील सदस्य आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

 
Top