नागपूर - इंग्लंडच्या संथ फलंदाजीने नागपूर कसोटीचा चौथा दिवस गाजवला. तर पाचव्‍या दिवशीही भारतीय गोलंदाजांना विकेट काढण्‍यात अपयश आले. अखेर नागपूर कसोटी अनिर्णित राहिली आणि भारताला लाजीरवाणा मालिका पराभव स्विकारावा लागला. इंग्‍लंडने दर्जेदार खेळ करुन मायदेशातही टीम इंडियाचे वस्‍त्रहरण केले. भारताने 28 वर्षांनंतर मायदेशात इंग्‍लंडविरुद्ध मालिका गमाविली.
         जॉनथन ट्रॉटनंतर इयन बेलनेही दमदार शतक ठोकले. इयन बेने 293 चेंडुंमध्‍ये 1 षटकार आणि 13 चौकारांसह शतक पूर्ण केले. खेळ संपला त्‍यावेळी बेल 116 तर जो रुट 20 धावांवर नाबाद होते. इग्‍लंडने 4 बाद 352 धावांवर डाव घोषित केला.
        भारताला मालिकेत बरोबरी साधण्‍यासाठी नागपूर कसोटी जिंकणे आवश्‍यक होते. परंतु, फलंदाज आणि गोलंदाजांनी सपशेल निराशा केली. खेळपट्टीकडूनही साथ मिळाली नाही. परंतु, इंग्‍लंडच्‍या खेळाडुंनी सर्वच क्षेत्रात भारतीय खेळाडुंवर मात केली. मोक्‍याच्‍या क्षणी कर्णधार कुकने मोठ्या खेळी करुन संघाला आघाडी मिळवून दिली. तर इंग्‍लंडचे फिरकी गोलंदाज गॅहम स्‍वान आणि मॉन्‍टी पानेसर भारतीय फिरकीपटुंपेक्षा सरस ठरले. महेंद्रसिंग धोनीला स्‍वतः जिगरबाज कामगिरी करुन संघाचे मनोबल उंचावण्‍यात अपयश आले. दिग्‍गज फलंदाजही सपशेल अपयशी ठरले. त्‍यामुळे इग्‍लंडचाच संघ खरा विजेता ठरला.
     मालिकेत 3 शतके ठोकून दमदार कामगिरी करणारा इग्‍लंडचा कर्णधार अॅलिस्‍टर कुक मालिकावीर ठरला. तर जेम्‍स अँडरसन सामनावीर ठरला.
 
Top