नळदुर्ग -: सद्य परिस्थितीत पिण्‍याचे पाणी व शेतीच्‍या पाण्‍याचे निटपणे व्‍यवस्‍थापन करणे ही काळाची गरज आहे. अन्‍यथा फार मोठे संकट आपल्‍यावर व भावी पिढीवर येऊ शकते. त्‍याकरीता शेतक-यांनी आपल्‍या गावातील व शिवारातील पाणी वापरताना काळजी घेणे आवश्‍यक आहे, असे मत कृषी सहाय्यक उमेश पोतदार यांनी व्‍यक्‍त केले.
    सातेफळ (ता. कळंब) येथे दि. 14 डिसेंबर रोजी वसुंधरा पाणलोट व्‍यवस्‍थापन कार्यक्रम अंतर्गत यशदा पुणे, परिवर्तन सामाजिक संस्‍था नळदुर्ग व तालुका कृषी अधिकारी कार्यालय कळंब यांच्‍या वतीने शेतक-यासाठी आयोजित केलेल्‍या प्रकल्‍प परिचय प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात पाणलोट विकासाच्‍या प्रकल्‍पातून कोणती कामे होणार आहेत, त्‍यात शेतक-यांनी कसा सहभाग द्यावा याबाबतची सविस्‍तर माहिती परिवर्तन सामाजिक संस्‍थेचे सचिव मारूती बनसोडे यांनी दिली. केंद्र सरकारच्‍या सामाईक मार्गदर्शक सुचना 2008 या पुस्तिकेचे वाटप शेतक-यांना करण्‍यात आले. या कार्यक्रमासाठी गावातील शेतकरी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. शेतक-यामध्‍ये सद्य परिस्थितीत असलेल्‍या अडचणीबाबत चर्चाही करण्‍यात आली. आण्‍णा सातपुते यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप करण्‍यात आला.
 
Top