बारामती -: ९३ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे उद्‌घाटन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते आज सकाळी थाटात झाले. त्यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार या जोडीला आपल्या शैलीत चांगलेच फैलावर घेतले. तसेच नाट्य कलावंतांनी रंगभूमीला नवीन काहीतरी सतत दिले पाहिजे, असा अनुभवी सल्ला दिला.
          शरद पवारांनी आपल्या उदघाटनीय भाषणात नाट्यचळवळीबद्दल कलावंतांना अनेक अनुभवी व मोलाचे सल्ले दिले. तसेच त्यांनी आपल्या शैलीत दादा-बाबा जोडीला फटकारले. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष अजित पवारांनी नाट्य परिषदेला आर्थिक मदत करण्याची सरकारची भूमिका असल्याचे जाहीर केले. तसेच नाट्य चळवळ व नाट्य संगीत जिवंत ठेवण्यासाठी मी प्रयत्न करेन. मात्र, सध्या मी बिनखात्याचा मंत्री आहे. त्यामुळे मला जर अर्थ खाते दिले तर मी नक्की तुम्हाला मदत देईन, असे वक्तव्य केले. या वक्तव्याचा आधार घेत त्यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री चव्हाणांनी अजितदादांना चिमटा काढला. अजितदादांना उद्देशून ते म्हणाले, तुम्ही आम्हाला विश्वासात न घेता राजीनामा दिला. आम्ही ते स्वीकारला. आताही तुम्ही तुमच्याच मर्जीने उपमुख्यमंत्रीपदी आरुढ झाला आहात. पण जे झाले ते जाऊ द्या. पण आता तुम्ही म्हणत आहात तर तुम्हाला तुमचे अर्थ व ऊर्जा खाते आम्ही परत देऊन टाकू, असे मत मांडले.
           चव्हाण यांच्यानंतर शरद पवार उदघाटनापर भाषण करण्यासाठी आले. पवारांनी प्रथम नाट्यचळवळ व मराठी नाटकाच्या परंपरेबाबत मत व्यक्त केले. मराठी नाटक चळवळ जिवंत ठेवण्यासाठी कलावंतांनी सतत काहीतरी नवे आणले पाहिजे व लोकांपुढे सादर केले पाहिजे असे मत व्यक्त केले. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा बाबा-दादा जोडीकडे वळवला. दादा-बाबांच्या वरील वक्तव्यांचा आधार घेत पवारसाहेब मुख्यमंत्र्यांना म्हणाले, ''दादांनी राजीनामा दिला मग आता ते परत मंत्रिमंडळात आले ठीक आहे. पण त्यांना कोणते खाते द्यायचे ते हे पण तुम्ही ठरवायला लागला. तुमचे (म्हणजे काँग्रेसचे) निर्णय दिल्लीतून होतात. तसे आमचे निर्णय मी स्वत: घेतो. पण असू द्या दादांनी मागणी केल्यानंतर तुम्ही ते द्यायला परत निघालाच आहात म्हटल्यावर माझी तुम्हाला खुशाल परवानगी आहे. '' पवारांच्या या खुमासदार वक्तव्याने सभागृहात एकच पिशा पिकला. खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा खदखदून हसले व पवारांना दाद दिली. तसेच त्यांच्याच शेजारी बसलेल्या अजितदादांनाही हसू आवरले नाही.  
      बारामती सज्ज - येथील एका विद्यालयाच्या प्रांगणात कविवर्य मोरोपंत नगरीत हे नाट्यसंमेलन होत आहे. या संमेलनासाठी मराठी रंगभूमी व चित्रपट क्षेत्रातील कलावंतांनी बारामतीत हजेरी लावली आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे आदी उपस्थित आहेत. मावळते अध्यक्ष श्रीकांत मोघे व संमेलनाध्यक्ष डॉ. मोहन आगाशे यांनीही भाषण केले. तसेच या संमेलनाचा आनंद व आस्वाद समस्त महाराष्ट्राला मिळावा, यासाठी दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण पाहता येईल, असे संमेलनाचे निमंत्रक किरण गुजर यांनी सांगितले.

* सौजन्‍य दिव्‍यमराठी
 
Top