उस्मानाबाद : अपंग विद्यार्थ्यांना शासकीय योजनेतील निधी  मिळावा  यासाठी   समाजातील सर्व घटकांनी सर्वतोपरी प्रयत्न करावा, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले.
      समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांचे मार्फत जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून स्वयंसेवी संस्थाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या अपंगाच्या शाळा/कर्मशाळा मधील अपंग मुला-मुलींच्या दोन दिवसीय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन श्री तुळजाभवानी स्टेडियम येथे करण्यात आले आहे. त्यावेळी ते उदघाटनप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे हे होते.
 याप्रसंगी जि.प.उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, समाजकल्याण सभापती दगडू धावारे,कृषी सभापती पंडीत जोकार, महिला व बालकल्याण सभापती सविता कोरे,जि.प.सदस्य काशीनाथ बंडगर,दतात्रय भालेराव,मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल.हरिदास, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत हजारे, अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव कोळेकर, अखिल भारतीय अपंग संघटनेचे चंद्रकांत जाधव,जिल्हा समाजकल्याण अधिकारी खुशाल गायकवाड, जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल देशपांडे आदि उपस्थित होते.
     पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, अपंग शाळेतील मुला-मुलींच्या सुप्त कला, क्रीडा विषयक गुणांना वाव मिळावा व त्यांच्यामधील खेळ भावना विकसीत होऊन त्यांचे जीवनाकडे पहाण्याचा सकारात्मक दृष्टीकोन निर्माण व्हावा यासाठी क्रीडा स्पर्धाचे आयोजन केले जाते. अपंगत्ववार मात करून त्यांच्या मध्ये खेळांच्या माध्यमातून आनंद निर्माण व आत्मविश्वास जागृत होईल असे सांगून ते पुढे म्हणाले की,अपंग विद्यार्थ्यांना  सुख सुविधेच्या बाबतीत शासन सर्वोतोपरी प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी सांगितले.     
    डॉ.व्हट्टे म्हणाले की, शाररिक अपंगापेक्षा मानसीक दृष्टया अपंगत्वावर मात करणे गरजेचे आहे. अपंग असल्यामुळे त्यांच्या जगण्याच्या अधिकारापासून त्यांना कोणीही वंचित ठेवू शकणार नाही. अपंगांच्या कला, क्रीडा व संस्कृतीला वाव देण्याची गरज आहे. अपंगांना सक्षम करण्यासाठी शिक्षण व साधनाच्या माध्यमातून जीवन आनंददायी करता येईल. जास्तीत जास्त अपंग खेळाडूंनी यश संपादन करुन प्राविण्य मिळावावे, अशा शुभेच्छा याप्रसंगी दिल्या.
       जिल्ह्यातील अपंग शाळा, कर्मशाळांतील अपंग मुला-मुलींच्या प्रवर्ग व वयोगटनिहाय विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे दि. 22 व 23 डिसेंबर रोजी आयोजन श्री तुळजाभवानी स्टेडियम,उस्मानाबाद येथे करण्यात आले आहे. स्पर्धेमध्ये अस्तिव्यंग, मुकबधिर, मनोविकलांग व अंध या प्रवर्गाच्या एकूण 23 शाळा मधील 444 स्पर्धक सहभागी होणार आहेत. या स्पर्धेमध्ये धावणे, गोळाफेक, थाळीफेक, व्हील चेअर रेस,सॉफटबॉल थ्रो, लांब उडी, बुध्दीबळ  आदि खेळाबरोबरच  सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमधून प्रथम क्रमांकाने विजेत्या स्पर्धकाचे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे.
    जिल्हा समाजकल्याण अधिकारी खुशाल गायकवाड यांनी प्रास्ताविकात अपंग खेळाडूनी जास्तीत जास्त भरीव कामगिरी करावी. यामुळे अपंग विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल,अशी अपेक्षा व्यक्त केली.
    कार्यक्रमाच्या सुरुवातीस क्रीडा ज्योत प्रज्वलीत करुन ध्वजारोहण करण्यात आले. अपंग मुला-मुलींनी तयार केलेल्या वस्तूंची पहाणी केली त्यानंतर व्हीलचेअर सायकल रेसला हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेचा प्रारंभ पालकमंत्री  चव्हाण यांनी केला.          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी नादरगे यांनी केले.
 
Top