नळदुर्ग -: सर्वत्र पाणीटंचाई आतापासूनच जाणू लागल्याने प्रशासनाने पाणीटंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना करुन नियोजन करीत आहे. मात्र लोहगाव (ता. तुळजापूर) येथील खंडाळा मध्यम प्रकल्पातून ऐन पाणीटंचाईच्या काळात शेतीसाठी पाणी उपसा सुरु असून तात्काळ पाणी उपसा बंद करण्याची मागणी नागरिकातून केली जात आहे.
नळदुर्ग व परिसरात पाणीटंचाईचे चटके आतापासूनच बसू लागल्याने भविष्यात पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर होणार असून प्रशासन सध्या उपाययोजना करीत आहे. तुळजापूर तालुक्यात सध्या उपलब्ध पाणीसाठा आहे तो या महिनाअखेरपर्यंत पुरेल इतका असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर यापुढे तालुक्यातील नागरिकांना पाण्याचा पुरवठा कसा करायचा हा प्रश्न यक्ष प्रश्न प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. परिसरातील पाणी साठे जवळपास संपुष्टात येत असून पाणी पुरवठयासाठी प्रशासनाने टँकर उपलब्ध केले. तरी त्या टँकरमध्ये पाणी कुठून भरायचे किंवा आणायचे, असा प्रश्न पडला आहे. तुळजापूर, नळदुर्ग शहरासह अणदूर गावाला नळदुर्ग येथील कुरनूर (बोरी धरण) मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. या धरणातही सध्या काही दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे. बोरी धरणातील पाणी संपले तर या तीन मोठ्या गावाना पाणीपुरवठा कसा होणार हा चिंतेचा विषय आहे. नळदुर्ग शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मुरुम जवळील बेन्नीतुरा प्रकल्पातील पाणी प्रशासनाने राखून ठेवले आहे. या बेन्नीतुरा प्रकल्पातून दररोज 20 टँकरने नळदुर्गला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. असे असले तरी हा प्रयत्न अतिशय खर्चीक असून एवढा खर्च होवूनही नळदुर्गला व्यवस्थित पाणीपुरवठा होवू शकणार नाही. त्यामुळे नळदुर्ग न.प. चे प्रभारी नगराध्यक्ष शहबाज काझी यांनी बोरी धरणातील काही कामाबरोबरच शहरात विंधन विहिरी घेण्यासाठी व आहे त्या विंधन विहिरीवरील मोटार दुरूस्तीच्या कामाबरोबरच बोरी धरणात विंधन विहिरी घेण्यासाठी जिल्हाधिका-यांकडे 25 लाख रु. अनुदान देण्याची मागणी केली आहे. बोरी धरणातील पाण्याचे नियोजन झाल्यास नळदुर्गला पाणीटंचाई जाणवू शकणार नाही. तसेच खंडाळा धरणातील पाणी उपसा काही शेतकरी करीत असून ते तात्काळ थांबविण्याची मागणी होत आहे.