सांगली -:  सापाचे एक लीटर वीष विक्रीसाठी घेवून आलेल्या दोघांना पोलिसांनी छापा टाकून शुक्रवारी रात्री उशीरा अटक केली. त्यात एका स्थानिक दलालाचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या विषाची किंमत एक कोटी 12 लाख इतकी आहे, अशी माहिती पोलिस अधिक्षक दिलीप सावंत यांनी दिली. राज्यात सर्प-वीषाची तस्करी करणारे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा शक्यता वर्तवली जात आहे.  चंद्रकांत टिकार आणि अब्बास हुसेन मुल्ला अशी आरोपींची  नावे आहेत.
     शहर विभागाच्या पोलिस उप-अधिक्षक कविता नेरकर यांना  मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे विश्रामबाग येथील शासकीय वसाहतीत चंद्रकांत टिकार याच्या झेरॉक्स दुकानात अब्बास हसन मुल्ला (वय 40 रा. कोवाड ता. चंदगड जि. कोल्हापूर) हा सापाचे वीष विक्रीसाठी घेवून आला होता. त्यांचा ‘व्यवहार’ सुरू असतानाच नेरकर यांच्या पथकाने छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. रात्रीच मानद वन्यजीव संरक्षक अजित उर्फ पापा पाटील आणि किरण नाईक यांच्याकडून विषाची खात्री करून ते मुंबईतील प्रयोगशाळेत तपासणीला पाठवण्यात आल्याचे पोलिस अधिक्षक सावंत यांनी सांगितले.
         एका सापापासून सरासरी 3 ते 4 मीली वीष मिळते. त्यामुळे एक लिटर विषासाठी मोठ्या संख्येने सापांचा वापर झाला आहे. एरवी साप पकडणे, हे सामान्याचे काम नाही. हे काम निष्णात सर्पमित्रच करू शकतात. सापाचे वीष घेवून आलेला अब्बास मुल्ला हा कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील असला तरी त्याची सर्पमित्र म्हनून कोठेही नोंद नाही. त्या परिसरात त्याची ओळखही नाही. त्यामुळे त्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात वीष कोठून आणले, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. यात मोठे रॅकेट कार्यरत असण्याचीही शक्यता असून पोलिस त्या दिशेने तपास करीत आहे.
न्यू इयर पार्ट्यांसाठी विषाची तस्करी?
सापाच्या विषाचा वापर ट्यूमरवरील औषधात जसा केला जातो; तसा नशा करण्यासाठीही केला जातो. विशेषत: रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचे वीष के 72, के 76 या नावाने विकले जाते. गोव्यामध्ये रेव्ह पार्ट्यांचे प्रमाण मोठे आहे. नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी गोव्यात अशा पार्ट्यांचे आयोजन केले जाते. या पार्ट्यांमध्ये विक्रीसाठी हे वीष आणले गेले असल्याचा पोलिसांना संशय आहे.
      ‘‘समाजात सर्पमित्र म्हणून वावरणारे अनेकजण विषाची तस्करी करत असल्याचे यापूर्वीही स्पष्ट झाले आहे. सांगली जिल्ह्यातच तीन वर्षांपूर्वी मिरजेत असेच एक रॅकेट उघडकीस आले होते. शासनाने ही बाब लक्षात घेवून सर्पमित्रांना ओळखपत्रे देवू नयेत.’’
- अजित पाटील, मानद वन्यजीव संरक्षक


* सौजन्‍य दिव्‍य मराठी
 
Top