सोलापूर : शिक्षण हक्क कायद्यामुळे ६ ते १४ वयोगटातील मुला-मुलींना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याचा हक्क प्राप्त झाला आहे. त्यांना चांगले, दर्जेदार शिक्षण देऊन देशाचा जबाबदार नागरिक बनविण्याचे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केले.
    भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त शहर पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले त्यावेळी पालकमंत्र्यांनी नागरिकांना आपल्या भाषणातुन शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार,महापालिका आयुक्त अजय सावरीकर, पोलीस आयुक्त प्रदिप रासकर, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेश प्रधान उपस्थित होते.
     पालकमंत्री ढोबळे आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले की, पोलीस व सैन्यातील जवानांनी देशासाठी केलेले बलीदान अमुल्य असून आपण सर्वांनी त्यासाठी कृतज्ञ राहुन त्यांना अभिवादन केले पाहिजे. देशाला प्रगतीपथावर घेऊन जाणारे व शेजारील राष्ट्रांची वाकडी नजर करुन बघण्याची हिंमत होऊ नये असे शिक्षण मुलांना देण्याची गरज आहे. सोलापूर जिल्ह्यात स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि उद्योग या सर्वच क्षेत्रात प्राधान्य द्यावे असेही शेवटी ते म्हणाले. 
    ध्वजारोहणानंतर परेडचे निरिक्षण करुन त्यांनी शहर पोलीस, राज्य राखीव दल, एन.सी.सी. आणि स्काऊट गाईड प्लॅटुनकडुन मानवंदना स्वीकारली. यावेळी पोलीय निरिक्षक प्रकाश पाटील यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल, जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयास आय. एस. ओ. मानांकन प्राप्त झाल्याबद्दल जिल्हा अधिक्षक बाळासाहेब वानखेडे आणि महिला व बाल विकास विभागाच्या वतीने अहिल्याबाई होळकर पुरस्कार मिळालेल्या श्रीमती प्रीती श्रीराम, सविता होरा आणि सविता मुदलीयार यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यानंतर इंडियन मॉडेल स्कुल, एस. आर. चंडक शाळा आणि ज्ञान प्रबोधिनी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
     नवीन प्रशासकीय इमारतीत अप्पर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, शकुंतला गायकवाड, जिल्हा उपनिबंधक श्रीकांत मोरे, यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दुष्काळी कामांसाठी समक्ष भेटण्याचे पालकमंत्री प्रा. ढोबळे यांचे आवाहन 
सोलापूर :-  टंचाई परिस्थितीमध्ये मजुरांना रोजगार, जनावरांना चारा, पाणी टंचाई तसेच पिण्याचा पाणी पुरवठा याबाबतच्या अडी-अडीचणींच्या सोडवणुकीच्या संदर्भात आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याच्या सुचना सर्व विभागप्रमुखंना देण्यात आलेल्या आहेत.  टंचाई निवारणामध्ये क्षेत्रीयस्तरावरील अधिका-यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यास सर्व नागरिकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी सोलापूर येथील माझ्या संपर्क कार्यालय इंदिरा गांधी स्टेडीयम (पार्क स्टेडीयम), डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सोलापूर ( दु. क्र. ०२१७-२३२९५७९) येथे सोमवार दि. २८ जानेवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत पालकमंत्र्यांना समक्ष भेटावे. ज्यांना समक्ष भेटणे शक्य होणार नाही अशा नागरिकांनी त्यांची लेखी निवेदने दोन प्रतीत संपर्क कार्यालयात पाठवावीत, असे आवाहन पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी केले आहेत.
 
Top