उस्मानाबाद -: दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यातील एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही. त्याठिकाणी पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यास शासन कटीबध्द आहे, अशी ग्वाही राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसायमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले.
      येथील पोलीस संचलन मैदानावर भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६३ व्या वर्धापनदिनाचा  मुख्य शासकीय समारंभ झाला. यावेळी पालकमंत्री  चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी  ते बोलत होते. यावेळी ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजास राष्ट्रीय सलामी देण्यात आली.
     आपल्या भाषणात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्वातंत्र्य चळवळीत बलीदान दिलेले स्वातंत्र्यसैनिक तसेच घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा  श्री. चव्हाण यांनी  कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला.
      पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, आपल्या जिल्ह्यात यंदा पुरेसा पाऊस झालेला नाही, त्यामुळे जिल्हा सध्या मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईचा सामना करीत आहे. मात्र पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विहिरी, विंधन विहीरींचे  अधिग्रहण करुन तसेच टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करुन ही तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. जिल्ह्यात सध्या ७७ गावात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय ३१३ गावे आणि ३३ वाड्यांना ७२२ विहिरी आणि विंधन विहिरी अधिग्रहित करुन त्यामार्फत पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय, उस्मानाबाद, परंडा आणि उमरगा या शहराच्या नागरी भागात ६५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जनावरांच्या चा-याचा प्रश्न ध्यानात घेऊन आपण भूम तालुक्यात चार छावण्यांना मंजूरी दिली असल्याची माहिती त्यांनी दिली. या दुष्काळी परिस्थितीत एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.
      ऩळयोजना दुरुस्ती, तात्पुरती ऩळयोजना, विहीर अधिग्रहण, टैंकर लावणे, विंधन विहिरी दुरुस्ती, नवीन विंधन विहीरी, गाळ काढणे आदी कामांसाठी ८८ कोटी रुपयांचा १३ जून पर्यंतचा आराखडा तयार करुन शासनास सादर करण्यात आला असल्याचे सांगून या कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. जिल्हा नियोजन समितीकडूनही टंचाई उपाययोजनांसाठी प्रत्येक तालुक्यास एक प्रमाणे ८ टैंकर खरेदी करण्यासाठी १ कोटी १२ लाख रुपये निधी उपलब्ध करुन दिला असल्याचे ते म्हणाले.
    राज्य शासनाने उस्मानाबाद शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी उजनी योजना तातडीने पूर्ण व्हावी, यासाठी निधी उपलब्ध करुन दिला असून उमरगा शहरासाठीची माकणी योजनाही दोन महिन्यात पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. या योजना पूर्ण झाल्यानंतर पाणीटंचाईची झळ निश्चित कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
    आगामी दोन-तीन महिने पाणीटंचाईच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत. अशा कठीण परिस्थितीत सर्वांनी पाणी जपून वापरावे, पाण्याचा पुनर्वापर करावा, असे आवाहन पालकमंत्री चव्हाण यांनी केले. सध्या नरेगा अंतर्गत आपण शेतरस्ते, विहीरी, रोपवाटिका, जलसंधारण आदिंची कामे हाती घेतली आहेत. आतापर्यंत जिल्ह्यासाठी ११०  कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या योजनेत सध्या ११ हजार २५ कामांचे नियोजन करण्यात आले आहे. त्याद्वारे ३ लाख १५ हजार ८८५ जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. पाणीटंचाईचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासनाने आराखडा तयार केला आहे. आगामी काळात उपलब्ध पाणी स्त्रोत लक्षात घेऊन या आराखड्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
       आपल्या जिल्ह्यात विविध विकास कामांद्वारे प्रगती साधली जात आहे. जिल्ह्यात २० उपकेंद्रे, दोन ग्रामीण रुग्णालये तसेच तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्थापना करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
        राज्य शासनाने प्राथमिक शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल केले आहेत. सहा ते चौदा वर्षे वयोगटातील सर्व बालकांना इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतचे शिक्षण मोफत आणि सक्तीचे असल्याचा मुलभूत हक्क बहाल करण्यात आला आहे. गुणवत्तापुर्ण आणि दर्जेदार शिक्षण घेण्याचा प्रत्येक बालकाचा हक्क आहे, असे त्यांनी नमूद केले.
 
Top