नळदुर्ग -: मैलारपूर (नळदुर्ग) येथील श्री खंडोबा यात्रेवर पडलेले भीषण पाणी टंचाईचे संकट गेल्या दोन दिवसांत घेतलेल्या तीन कुपनलिकेमुळे दूर झाले आहे.
          उस्मानाबाद जिल्ह्यात यंदा पाऊस अत्यल्प पडल्याने सर्वत्र भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील ९५ टक्के मध्यम आणि लघु पाटबंधारे कोरडेठाक पडले आहेत.त्यामुळे लोकांना पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागत आहे.जिल्ह्यात पाणी टंचाई दूर करण्यासाठी कुपनलिका घेतल्या जात आहेत.मात्र ५०० फूट खोलवर जावूनही पाणी लागत नसल्यामुळे लोक चिंताग्रस्त आहेत.
           मैलारपूर येथील श्री खंडोबा मंदिराच्या शेजारी बोरी नदीचे पात्र आहे. या पात्रात दरवर्षी बोरी धरणाचे पाणी सोडले जात होते,ऐवढेच नाही तर जवळच्या कॅनॉनमधूनही पाणी सोडले जात असे.मात्र यंदा बोरी धरणाने तळ गाठल्याने, श्री खंडोबा यात्रा कशी पार पडणार म्हणून भाविकासह श्री खंडोबा मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी चिंताग्रस्त होते.कारण यात्रेसाठी किमान पाच लाख भाविक हजेरी लावत असतात.तसेच दोन लाखाहून अधिक भाविक मुक्कामी येत असतात.
           मंदिर परिसरात पुर्वी पासून एक कुपनलिका आहे.मात्र भाविकांना अंघोळीसाठी सोय व्हावी म्हणून गेल्या दोन दिवसांत एकूण तीन कुपनलिका घेण्यात आल्या.पानड्याला दाखवून खोदलेल्या एका कुपनलिकेला दीड इंची तर दुस-या कुपनलिकेला अडीच इंची पाणी लागले.ऐवढ्यावर प्रश्न मिटणार नाही,म्हणून एका ठिकाणी भंडारा टाकून येळकोट,येळकोट जयघोष करीत खोदलेल्या कुपनलिकेला चक्क पाच इंची पाणी लागले आणि भाविकांसह ट्रस्टच्या पदाधिका-यांचे चेहरे उजळले.दोन कुपनलिकेला केवळ दीडशे फुटावर पाणी लागले आहे, हे विशेष.
            दीड इंची पाणी लागलेल्या कुपनलिकेवर तातडीने हापसा बसविण्यात आला तर अडीच आणि पाच इंची पाणी लागलेल्या कुपनलिकेवर पाण्यातील मोटारी बसवून पाणी उपसा करण्यात आले.यावेळी विधीवत पुजा करण्यात आली.या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश मोकाशे, उपाध्यक्ष दिलीप शिवराम मोकाशे, सचिव सुनील ढेपे, सदस्य अशोक मोकाशे, दिलीप गोविंदराव मोकाशे आदी उपस्थित होते.
 
Top