
जिल्ह्यातील तालुकास्तरीय दुष्काळी व पाणी टंचाई परिस्थिती लक्षात घेऊन पाणीटंचाई संदर्भात पालकमंत्री चव्हाण यांनी उमरगा, लोहारा, कळंब आणि वाशी या ठिकाणी दुष्काळ निवारणासाठी बैठका घेतल्या. आज त्यांनी परंडा आणि भूम येथे आढावा बैठक घेतली. त्यावेळी परंडा येथे बोलतांना वरील प्रतिपादन केले.
या बैठकीस खासदार डॉ. पदमसिंह पाटील, गोदावरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा आमदार राहूल मोटे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ.सुभाष व्हट्टे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, अर्थ व बांधकाम सभापती धनंजय सावंत, पंचायत समिती सभापती सौ.काशीबाई इतापे, उपसभापती मेघराज पाटील, नगराध्यक्षा सौ.राजश्री शिंदे, न.प.उपसभापती सुभाषसिंह सद्दीवाल यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. के.एम. नागरगोजे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल.हरिदास, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत हजारे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एन.तागडे, उपविभागीय अधिकारी शोभा ठाकूर, तहसीलदार सौ. वैशाली पाटील, गटविकास अधिकारी श्री. जाधव, महादेव अंधारे, दत्ता साळूंके आदिंसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.
पाणी टंचाईच्या निवारणासाठी नादुरुस्त नळयोजना दुरुस्त करणे, पाण्याची गळती थांबविणे, गावातील बोर दुरुस्त करणे, रिबोर करुन घेणे आणि विंधन विहीरींची कामे तातडीने करणे, अशा प्रश्नावर कामाचा तात्काळ आराखडा तयार करावा, असे प्रतिपादन पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले.
परंडा तालुक्यातील कृषी विभागातील साठवण व पाझर तलाव, शेततळे व 1 हजार 500 मंजूर विंधन विहिरींची कामांचा लोकप्रतिनिधी व संबंधित यंत्रणेनी बैठक घेऊन आढावा घ्यावा.त्यानंतर त्यांचा सर्व्हे करुन त्यामध्ये खोदकाम करण्यासाठी मजूरांना कामे द्यावीत. मागेल त्याला काम व निधी शासनाकडून कमी पडू दिला जाणार नाही. शासनाचा निधी वाया जाणार नाही याची काळजी सर्वस्तरातील लोकांनी घ्यावी तसेच जनावरांसाठी चारा उपलब्ध होण्यासाठी छावणीची मागणी येताच त्याला प्रशासनाकडून मंजूरी देण्यात येईल, असे सांगून ते पुढे म्हणाले की, भारत निर्माण, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल, तात्पूत्या नळ योजनांचं प्रस्ताव सादर करुन त्याला तात्काळ मंजूरी घ्यावी. मागणीप्रमाणे विहिर व बोअर चे अधिग्रहण करावे तसेच मागणी प्रमाणे टँकरही उपलब्ध करुन देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
डॉ.खासदार पाटील यावेळी म्हणाले की, यावर्षी पाऊस कमी पडल्याने टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे सांगून ते पुढे म्हणाले की, बारमाही शेतीसाठी ठिंबक सिंचनाद्वारे करावी म्हणजे पाण्याची बचत होईल. पिण्याचे पाणी व जनावरांसाठी छावण्या उभारण्यात याव्यात,असे आवाहन केले.
आ.मोटे म्हणाले की, या भागातील खासापूरीचा प्रकल्पाचे काम मार्गी लावले तर पाणी टंचाई मात करता येईल. पाणी प्रश्नावर तात्काळ प्रस्ताव संबंधितांना सादर करा,असे आवाहन केले. तालुक्यात असणा-या अडीअडीचणी सर्वांनी मिळून सोडविण्यात असेही त्यांनी सांगितले.
जि.प.अध्यक्ष श्री. व्हट्टे म्हणाले की, पाण्याचे निर्मूलन करण्यासाठी भूपृष्ठावरील पाण्याचा उपसा सिंचनासाठी करावा. कोरडया तलावात विंधन विहिरी बुडाल्या असतील तर त्यातील गाळ काढावा. पाण्याचा काटकसरीने वापर करावा तसेच पाण्याचे पुर्नरवापर करुन पाण्याची बचत करावी,असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांनी प्रास्ताविकात पाण्याची भूगर्भातील पातळी खोलवर गेली आहे. भूपृष्ठावरील पाण्याची पातळी उंचाविण्यासाठी छतावरील पाण्याचे पुर्नरभरण करावे. खोलवरील जूने पाणी बोअरद्वारे काढून घेऊ नका. सिंचनासाठी विहिंर व तलावातील पाण्याचा वापर करा. त्यामुळे पाणी पातळी वाढण्यास मदत होईल. पाण्याचा काटकसरीने वापर करा. गाव पातळीवर पाण्याचे नियोजन करुन संबंधित यंत्रणेमार्फत प्रस्ताव पाठवा त्या प्रस्तावास तात्काळ मंजूरी दिली जाईल. शेवटचा पर्याय म्हणून पाण्यासाठी टँकरचा वापर करावा,असे त्यांनी सांगितले
प्रांरभी पालकमंत्री चव्हाण यांनी सर्व पदाधिकारी, सरपंच, ग्रामसेवक यांनी मांडलेल्या पाणीटंचाई,चारा टंचाई आणि रोहयोच्या कामाबाबतच्या प्रश्नांबाबत वस्तूस्थिती जाणून घेतली. ज्यांच्या अडी-अडीचणी असतील त्यांनी लेखी स्वरुपात सादर कराव्यात त्या प्रश्नाचे तात्काळ निराकरण करण्यात येईल, अशी माहिती बैठकीत दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी हरिदास यांनी परंडा तालुक्यातील येथील ग्रामसेवक आणि सरपंच यांना बैठकीच्या पुर्वसंधेला मार्गदर्शन करतांना सांगितले की, पाणी पुरवठा योजना, रोहयोची कामे, पाण्याचे महत्व आणि काटकसरीने पाण्याचा वापर, स्वचछ गाव, हागणदारी मुक्त गाव, कर वसूली , पाणी गळती होऊ नये यासाठी सर्वांनी उपाययोजनां करण्याबाबत सविस्तर माहिती दिली.
या आढावा बैठकीस जि.प.सदस्य, संबंधित सभापती, पंचायत समिती सदस्य, तालुकास्तीय अधिकारी, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, नरेगा कर्मचारी, नगर पालिका कर्मचारी पत्रकार आदी मोठया संख्येने उपस्थित होते.