नळदुर्ग -: मैलारपूर (नळदुर्ग) येथील श्री खंडोबा यात्रेत सोमवारी पहाटे छबीना निघाला असता विजेच्‍या धक्‍क्‍याने दोघा भाविकांचा करुण अंत झाला. अशी घटना घडण्‍याची यात्रेच्‍या इतिहासातील पहिली घटना ठरली आहे. गेल्‍या काही वर्षापासून खंडोबाची यात्रा मोठ्याप्रमाणावर भरत आहे. मात्र त्‍या पार्श्‍वभूमीवर विशेष उपाययोजना करण्‍यात येत नसल्‍याचे निदर्शनास येत आहे. या घटनेवरुन मंदीर समिती व प्रशासनाने बोध घेऊन भविष्‍यात अनुचित प्रकार अथवा दुर्घटना घडू नये, यासाठी उपाययोजना करण्‍याची मागणी भाविकांतून केली जात आहे.
      नळदुर्ग येथील श्री खंडोबाची यात्रा राज्‍यासह सीमेलगत असणा-या परप्रांतातही ऐतिहासिक काळापासून प्रसिध्‍द आहे. पूर्वी यात्रेकरु भाविक बैलगाडीने श्री खंडोबाच्‍या दर्शनासाठी येणारे आज आपापली वाहने घेऊन येतात. भाविकांची वाढलेली गर्दी पाहता मंदीर परिसर आज अपुरे पडत असल्‍याचे दिसत आहे. भंडारा, प्रसाद व खेळणी यासह इतर दुकाने अरुंद रस्‍त्‍यावरच थाटलेली असल्‍याने भाविकांना रहदारीसाठी रस्‍ता अपुरा पडत असल्‍याने प्रचंड दाटीवाटीने जावे लागते. श्री खंडोबाच्‍या छबीन्‍यासाठी भाविक लाखोंच्‍या संख्‍येने रविवारी मैलारपुरात मानाच्‍या काठ्यासह दाखल झाले होते. या छबीन्‍यात मानाच्‍या काठ्यासह भाविक मोठ्याप्रमाणाने सहभागी झाल्‍यामुळे प्रचंड गर्दी झाली होती. अनेक काठ्यावर विद्युत रोषणाई करण्‍यात आली होती. काठ्या भली मोठी व उंचीच्‍या असल्‍यामुळे प्रसंगी तोल जाताना अन्‍य भक्‍त त्‍यास सावरत होते. काठ्या नाचविताना मोठी तारेवरची कसरत करावी लागते. खंडोबाच्‍या नवीन मंदिरापासून निघालेला छबीना जुन्‍या खंडोबा मंदिराकडे जात असताना काही अंतरावर कोकणे यांची काठी नाचवित असताना सदरील काठी वरच्‍या बाजूस असणा-या 33 के.व्‍ही. उच्‍च दाबाच्‍या विद्युत वाहिनीस स्‍पर्श झाल्‍याने विद्युत प्रवाह काठीत उतरल्‍याने दोघेजण मृत्‍यूमुखी पडले व तिघेजण गंभीर जखमी झाले. यावेळी तात्‍काळ वीज प्रवाह बंद पडल्‍याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर जखमीना औषधोपचाराकरीता घटनास्‍थळावरुन हलविताना सुरक्षा यंत्रणेला किंवा मदत करु इच्छिणा-याना मोठी कसरत करावी लागली. कारण अरुंद रस्‍ते, दाटीवाटीने थाटलेली दुकाने यामुळे भाविकांना मोठ्या गैरसोयीला तोंड द्यावे लागले. मैलारपुरच्‍या खंडोबा मंदीराकडे जाणारे रस्‍त्‍याची अत्‍यंत दुरावस्‍था झाली आहे. रस्‍ते दुरुस्‍त करुन मोठे करणे गरजेचे आहे. त्‍याचबरोबर वाढत्‍या यात्रेच्‍या अनुषंगाने यापुढे तरी मंदीर समिती व प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्‍हणून विस्‍तीर्ण अशी यात्रा भरविण्‍यासाठी आवश्‍यक उपाययोजना व योग्‍य नियोजन करण्‍याची मागणी भाविक, नागरिकातून केली जात आहे. केवळ यात्रा जवळ आली किंवा अणदूरहून पावणे दोन महिन्‍याच्‍या वास्‍तव्‍यासाठी श्री खंडोबा मैलारपूरला आले तर भाविकांच्‍या सोयीसाठी अमुक करु तमुक करु गप्‍पा मारण्‍याऐवजी योग्‍य नियोजन करावे, कारण वर्षभर मैलारपूर येथील मंदिरात भाविक दर्शनासाठी येत असल्‍याचे सर्वश्रूत आहे.
 
Top