सोलापूर :- निर्मल भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात सुरु असलेल्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन शंभर टक्के यशस्वी करण्याकरीता विस्तार अधिका-यांसह सर्व समन्वयकांनी सामाजिक जाणीव ठेवून काम करावे अशा सूचना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी यांनी दिल्या.
    जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत उपस्थित होते.
    डॉ. माळी यावेळी म्हणाल्या की, या मिशन अंतर्गत सर्व गट व समुह समन्वयकांना प्रत्यक्ष फिल्डवर काम करण्याचा अनुभव मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येकानेच जीव ओतून हे मिशन पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी कष्ट घेतले पाहिजे. ग्रामीण भागातील लोकांची मानसिकता समजुन आणि स्वत:च्या जबाबदारीची जाणीव ठेवून हगणदारीमुक्त गाव होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी विद्यापीठस्तरीय ५०० विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून १ ते १० फेब्रुवारी दरम्यान मोडनिंब येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरार्थींच्या माध्यमातून ग्रामीण भागात शौचालय बांधण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
    यावेळी राऊत यांनी जिल्ह्यातील विविध तालुक्यातील निर्मल भारत अभियानात निवड झालेल्या १६८ गावांमधुन चालु असलेल्या या योजनेचा आढावा घेतला. तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अभियान  उत्कृष्टपणे राबविण्यासाठी मार्गदर्शक सुचना दिल्या. या मिशन अंतर्गत ३० जानेवारीपर्यंत शौचालय बांधण्यासाठी बेसलाईन सर्वे पूर्ण करुन या सर्वेच्या हार्ड व सॉफ्ट कॉपी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागात जमा करण्यास सांगितले.
    निर्मल भारत योजने अंतर्गत सुरु असलेल्या जिल्हा व पाणी स्वच्छता मिशनद्वारे १६८ गावांमध्ये वैयक्तिक शौचालय तसेच अंगणवाडी, शालेय स्वच्छता गृहाच्या बांधकामातील मजुरी खर्च महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे ४ हजार ५०० व निर्मल भारत अभियानातुन ४ हजार ६०० तर लाभार्थ्यांच्या वैयक्त्तिक वाट्यातुन ९०० रुपये  असे एकूण १० हजार रुपये शौचालय बांधणीसाठी मिळणार आहेत.
    या बैठकीस सर्व विस्तार अधिकारी, गट समन्वयक व समुह समन्वयक उपस्थित होते.
 
Top