उस्मानाबाद -: राज्याचे पशुसंवर्धन दुग्धविकास व मश्यव्यावसाय मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी पाणीटंचाई व दुष्काळ निवारणार्थ करावयाच्या उपाययोजनांबाबत तुळजापूर तालुकयातील ढेकरी, शिराढोण, अमृतवाडी, सिंदफळ, सांगवी (मार्डी) आणि  सारोळा या गावांना भेटी देऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. रिकाम्या हातांना काम देण्यासाठी रोजगार हमी योजनेत कामांचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचा लाभ गरजूंनी घ्यावा. या पाणीटंचाईच्या काळात पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन चव्हाण यांनी या दौ-याप्रसंगी केले.
        पालकमंत्री चव्हाण यांच्या या दौ-यात जि.प.सदस्य धिरज पाटील, पं. स. सभापती मनीषा पाटील, उपसभापती प्रकाश चव्हाण, जि.प. कृषी सभापती पंडीत जोकार, नायब तहसीलदार भरत सुर्यवंशी, कृषी अधिकारी डी.आर.जाधव., पं.स सदस्य  मोक्षदा गोरे, चंद्रशेखर वडणे आदी उपस्थित हाते.
      ढेकरी येथील दौऱ्यात पालकमंत्री चव्हाण यांनी, ज्या विहिरींना पाणी आहे तेथून पाईप टाकुन पाणी उपलब्ध करुन देण्याच्या सुचना संबंधित अधिका-यांना दिल्या. शिराढोण येथील दलीत वस्तीमध्ये एकशे पंचविस मीटर सिमेंट रस्त्याचे भुमीपुजन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. भारत निर्माण योजना राष्ट्रीय ग्रामिण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजनेचे भुमीपुजनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. या कामास अंदाजे ४० लाख २८ हजार इतका खर्च येणार असून यामध्ये ४० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी असणार आहे. या सुविधेमुळे शिराढोण ग्रामस्थांना कायमस्वरुपी पाणीपुरवठा करण्याची सोय होणार आहे.
      अमृतवाडी, सिंदफळ, सांगवी मार्डी, सारोळा येथील ग्रामस्थांच्या अडीअडचणी समजावून घेउन गावातील उपलब्ध असणारे पाणी जनतेस देण्यासाठी जे हातपंप नादुरुस्त आहेत ते दुरुस्त करुन घेणे, ज्या विहिरींना पाणी आहे तेथुन पाईप टाकुन पाणी गावात आणून जनतेस उपलब्ध करुन देणे, तलाव, विहिरींमधील गाळ काढणे व नविन विहिरी घेणे याबाबत संबंधित अधिका-यांना पालकमंत्रा चव्हाण यांनी सुचना दिल्या. ज्यांचेकडे वीज बील थकीत आहे ते तात्काळ भरुन शासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. दौऱ्याप्रसंगी संबंधित गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
 
Top