उस्‍मानाबाद -:  हरीण व काळविटांची शिकार करणारे आरोपी चार वर्षापासून फरार असलेल्‍या अट्टल गुन्‍हेगारांच्‍या मुसक्‍या (दरोडा प्रतिबंधक पथकाचे) पोलीसानी सापळा रचून आवळल्‍या. ही घटना सोमवार दि. २८ जानेवारी रोजी मस्‍सा (ता. कळंब) शिवारात घडली.
    नाना बिरु काळे, सुभाष बिरु काळे, राजु विलास काळे, विलास माणिक काळे, शंकर पापा काळे, शंकर आबा काळे, पाण्‍या कबु काळे (सर्व रा. मस्‍सा व अंदोरा ता. कळंब) असे फरारी लोकांना पोलीसानी ताब्‍यात घेऊन त्‍यांची सखोल चौकशी करुन पुढील कारवाईसाठी वाशी पोलीस ठाण्‍यात हजर केले आहे. याप्रकरणी २९ ऑगस्‍ट २००९ रोजी दुपारी मांडवा (ता. वाशी) शिवारात हरीण व काळविट पकडून मोटार सायकलवर घेऊन जात असल्‍याचे पोलीसाना माहिती मिळाली. त्‍यावरुन या शिकारी लोकांचा पोलीस पाठलाग करीत असताना हे पाहून सर्व शिकारी पळून जाण्‍यात यशस्‍वी झाले. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्‍यात हवालदार अशोक जगताप यांच्‍या फिर्यादीवरुन वन्‍यजीव संरक्षण अधिनियमप्रमाणे दहा गुन्‍हेगारांवर गुन्‍हा नोंद करण्‍यात आला होता. तेव्‍हापासून सदरील गुन्‍हेगार फरार होते. वन्‍यजीवन कायद्यातील फरारी आरोपींचा शोध दरोडा प्रतिबंधक पथक पोलीस अधिक्षक यांच्‍या मार्गदर्शनाखाली सोमवार रोजी घेत असताना वरील माहिती मिळाली. त्‍यावरुन मस्‍सा (ता. कळंब) शिवारात दरोडा प्रतिबंधक पथकाने सापळा रचून एका शेतामध्‍ये वरील फरारी आरोपींना पकडण्‍यात यश मिळविले. ही कामगिरी जिल्‍हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, अप्‍पर पोलीस अधिक्षक बाळकृष्‍ण भांगे, गुन्‍हे शाखेचे पोलीस निरीक्षक एम.डी. गुंडीले यांच्‍या मार्गदर्शनाखाली दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गोमारे व त्‍यांचे सहकारी मधुकर घायाळ, संजय पानसे, तानाजी माळी, मोईज काझी, वाहेद मुल्‍ला, नाना भोसले, सुनिल कोळेकर, प्रफुल ढगे, सचिन कळसाईन यांनी पार पाडली. 
 
Top