नळदुर्ग -: श्री खंडोबाचा छबीना मिरवणूक सुरु असताना अचानक विजेचा धक्‍का बसून दोघे भाविक ठार झाले. तर तिघेजण गंभीर जखमी झाल्‍याची घटना दि. २८ जानेवारी रोजी पहाटे पावणे चार वाजता नळदुर्गच्‍या मैलारपूर खंडोबा यात्रेत वरील दुर्दैवी घटना घडली.
         संतोष दासू चव्‍हाण (वय ३५ वर्षे, रा. वसंतनगर, नळदुर्ग), महादेव नारायण कोकणे (वय २५ वर्षे, रा. नळदुर्ग) असे दोघेजण विजेच्‍या धक्‍क्‍याने मरण पावले असून दिपक नारायण कोकणे (वय ३२ वर्षे), प्रकाश आप्‍पाराव कोकणे (वय ४२ वर्षे), सखाराम मसाजी कोकणे (वय ५८ वर्षे) तिघे रा. नळदुर्ग, असे गंभीर जखमी झालेल्‍यांची नावे आहेत. मैलारपूर येथील श्री खंडोबाच्‍या यात्रेत दुर्देवी घटनेमुळे गालबोट लागले आहे. छबिन्याच्या वेळी नंदीध्वजाची काठी नाचवत असताना वरून जाणा-या विद्युत तारेला काठीचा स्पर्श झाल्यामुळे ठिणग्या पडून, तसेच विजेचा धक्का लागून दोघांचा होरपळून मृत्यू झाला तर तिघेजण गंभीररित्या जखमी झाले.
       मैलारपूर येथील श्री खंडोबाच्‍या यात्रेस शनिवार रोजीपासून प्रारंभ झाले आहे. रविवार हा यात्रेचा मुख्य दिवस होता. यात्रेसाठी चार लाखापेक्षा अधिक भाविकांनी गर्दी केली होती. यावर्षी दुष्काळी परिस्थिती असतानाही भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. दिवसभरात सोलापूर, लातूर, उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील गावोगावाहून मोठ्या उत्‍साहाने काठ्यांचे आगमन झाल्यानंतर रात्री बारा वाजण्याच्या सुमारास नळदुर्गच्या मानाच्या काठ्याचें आगमन झाले. त्यात कोकणे कुटुंबियाचीही काठी सहभागी झाली होती. नळदुर्गच्या काठ्यानंतर रात्री दीडच्या सुमारास अणदूरच्या मानाच्या घोड्याचे आणि पालखींचे आगमन झाले. नंतर अणदूर आणि नळदुर्गच्या मानक-यांचा देवाच्या मुर्तीसमोर फेटा बांधून मानपान करण्यात आल्यानंतर तीन वाजण्याचा सुमारास श्री च्‍या छबिन्यास सुरुवात झाली. समोर अणदूरहून आलेले दोन घोडे, नंतर श्री खंडोबाची पालखी नंतर विविध गावच्या नंदीध्वजाच्या काठ्या वाद्यासह छबिना प्रदक्षिणा घालण्यास निघाला असता पहाटे पावणे चार वाजता छाबिना चालू असताना नळदुर्गच्या कोकणे परिवाराची नंदीध्वजाची काठी नाचवत असताना सदर काठी वरून जाणा-या विद्युत तारेला चिकटल्यामुळे मोठा स्फोट झाला आणि विजेच्या ठिणग्या उडाल्या. यावेळी विजेचा मोठा धक्का लागून वसंतनगरचा संतोष चव्हाण हा जागीच मृत्यू पावला. तर दवाखान्यात नेत असताना नळदुर्गचा महादेव कोकणे हा मरण पावला. तर प्रकाश कोकणे, दीपक कोकणे, सखाराम कोकणे हे जखमी झाले. कोकणे यांच्या काठीसमवेत जनरेटरचे वाहन होते. जनरेटरवर काठीला विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्यासाठी तारेची बायडिंग वायर वापरण्यात आली होती. काठी तल्लीन होवून नाचवत असताना सदर काठी विद्युत तारेला चिकटल्यामुळे करंट उतरून हा दुर्देवी प्रकार घडला. महादेव कोकणे हा काठी नाचवत होता, तर संतोष चव्हाण हा जनरेटर वाहनांवर होता. अन्य लोक विद्युत ठिणग्या पडल्यामुळे जखमी झाले. या दुर्देवी घटनेमुळे नळदुर्ग परिसरावर शोककळा पसरली. त्‍याचबरोबर भाविक व नागरिकातून हळहळ व्‍यक्‍त केली जात आहे.
         नळदुर्ग शहराच्‍या उत्‍तर दिशेला मैलारपूर येथील बोरी नदीच्‍या काठावर खंडोबाचे मंदीर असून शाकंभरी पौर्णिमेनिमित्‍त रविवारी श्री खंडोबाच्या यात्रेस महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या कानाकोप-यासह परप्रांतातून लाखो भाविक खंडोबाचे दर्शन घेण्‍यासाठी मैलारपूरात दाखल झाले होते. यावेळी खंडोबा यात्रेत निघालेल्‍या छबीना मिरवणुकीत काठी आकर्षक विद्युत रोषणाई करण्‍यात आल्‍या होत्‍या. या घटनेतील जखमीना सोलापूर येथे उपचारासाठी हलविण्‍यात आले आहे. या घटनेची खबर नारायण राम कोकणे यांनी पोलीसात दिल्‍यावरुन आकस्‍मात मृत्‍यू म्‍हणून दाखल करण्‍यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शेटकर हे करीत आहेत.
 
Top