पत्रकार मित्रानो,
        आपल्यासाठी एक धक्कादायक बातमी आहे. अमेरिकेतील "कऱिअर कास्ट' या कंपनीने केलेल्या एका पाहणीत ज्या सर्वाधिक दहा वाईट नोक-या आहेत. त्यात पत्रकाराची नोकरी पाचव्या स्थानावर असल्याचं आढळून आलं आहे. सर्वाधिक वाईट आणि सर्वाधिक चांगल्या नोक-या कोणत्या याची पाहणी करताना करिअर कास्टला असे आढळून आले आहे की, वेटर ही सर्वात वाईट नोकरी आहे. त्या खालोखाल कपबश्या धुणारे आणि खाटीक, सुतार यांचा क्रम लागतो. त्यानंतर वाईट पत्रकाराच्या नोकरीचा क्रम लागतो. हा क्रम ठरविताना कास्टने जे निकष लावलेत त्यात शारीरिक दगदग, कामाचे वातावरण, उत्पन्न, ताण आणि रोजगार क्षमता आदिंचा समावेश आहे. या सर्वच बाबतीत पत्रकाराची नोकरी वाईट असल्याचे आढळून आले आहे. पत्रकारितेत धोके ही अधिक असल्याचे दिसून आलं आहे. या बरोबरच डिजिटल माहिती आणि माहितीचा पुरवठा मागणीप्रमाणे करण्याच्या काळात वृत्तपत्र आणि वाहिन्यासाठी वृत्तसंकलन करणा-यांची मागणी घटू लागल्याचेही या पाहणीत आढळून आलं आहे. ताण, विरळ होत जाणा-या संधी आणि अत्यल्प उत्पन्न यामुळे पत्रकारिता वंगळ नोकरीच्या यादीत गेल्याचं स्पष्ट झालं आहे. स्पॉफ्टवेअर इंजिनिअऱची नोकरी सर्वात चांगली आहे. ते सरासरी 88 हजार डॉलर्स वर्षाला कमावतात.
    पत्रकारितेत वलय दिसते, झगमगाट दिसतो. मात्र तो दिखावा आहे. वास्तवात पत्रकाराचे जीवन कमालीचे अस्थिर आणि असुरक्षित आहे. आयुष्यभर जगाच्या उठाठेवी करणा-या पत्रकारांच्या उत्तर आयुष्यात ज्या समस्यांना सामोरे जावे लागते त्या अंगावर काटा आणणा-या असतात. आयुष्यभर निष्टेनं सेवा करणारे अनेक पत्रकार निवृत्ती नंतर आज महाराष्ट्रात कोणत्या अवस्थेत जगत आहेत, हे मी बघतो आहे. महाराष्ट्र सरकार त्यांच्यासाठी काही करीत नाही. समाजानेही त्यांना वा-यावर सोडले आहे.
     आपल्याकडं लेबर लॉ असल्यानं कोणालाही कामावरून काढताना त्याला किमान कायद्यानं संरक्षण आहे. मात्र पत्रकाराला तेही संरक्षण नाही पत्रकाराची नोकरी आज आहे आणि उद्या नाही अशी स्थिती आहे. अनेक ठिकाणी पीएफ, ग्रॅच्यूएटीचंही संरक्षण पत्रकारांना नाही. जिथं आङे तिथं त्याच्या पीएफ अर्जावर स्वाक्षरी करायलाही मॅनेजमेंट टाळाटाळ करते. पत्रकारांची ही अवस्था वधु पित्यांना माहित असल्याने लग्नाच्या बाजारातही पत्रकाराला मागणी नाही. ही सारी वस्तुस्थिती असताना पत्रकार सा-या जगाची काळजी आणि जबाबदारी आपल्यावरच आहे अशा तोऱ्यात वावरत असतात ज्यांना स्वतःची काळजी करता येत नाही ते जगाची काळजी करीत राहतात ही गंमत आहे. नव्यानं पत्रकारितेत येणा-यासाठी मात्र कास्टची पाहणी हजारदा विचार करायला लावणारी आहे हे नक्की.
     अर्थात हे सारं खरं असलं तरी पत्रकारिता ही "खाज'' असल्यानं या सा-या परिस्थितीतही अनेक पत्रकार निष्टेनं काम करीत आहेत. नव्यानं पत्रकारितेत येणा-यांची संख्याही कमी नाही हे ही तेवढंच खऱं.

साभार - पत्रकार एस.एम. देशमुख 
यांच्‍या फेसबुकवरुन
 
Top