ग्रामीण भागातील पत्रकारांची अवस्था किती बिकट आहे याची अंगावर शहारे आणणारी बातमी आज वाचनात आली. बातमी आहे पश्चिम बंगालमधील.चितरंजन-मिहिनाम येथील स्थानिक वृत्तपत्राचे वार्ताहर पंकज मिश्रा यांचे थोरले बंधू निरज मानसिकदृष्टया विकलांग होते. वडिल रेल्वेत होते, तोपर्यत किमान इलाज झाले. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर उत्पन्नच थांबले. पंकज यांना स्थानिक वृत्तपत्रात केवळ एक हजार रूपये पगार मिळायचा.यामध्ये घऱ चालविणे शक्य नव्हते. त्यामुळे ते आपल्या भावाला पोटभर अन्न देऊ शकले नाहीत आणि त्यांच्यावर योग्य उपचारही करू शकले नाहीत. त्यामुळं अर्धपोटी आणि उपचाराअभावी निरज यांच नुकतच निधन झालं आहे. पंकज यांना रेल्वेनं अनुकंपा तत्वावर नोकरी द्यावी म्हणून त्यांनी रेल्वे कडं अर्ज केलेला आहे. पण तो अजून पडून आहे.
      पत्रकारितेची दुनिया मोहमयी आहे.मात्र या मोहमयी दुनियेतली दुसरी बाजू काळीकुट्ट आणि तेवढीच काळजी वाटावी अशी आहे. महाराष्ट्रातही किमान पन्नास ज्येष्ठ पत्रकार माझ्या माहितीत आहेत की, त्यांच्यासमोर आज मोठी आर्थिक अडचण आहे. औषधोपचारासाठीही पैसे नाहीत. पण त्याची ना समाजाला काळजी ना सरकारला. समाजाला केवळ ब्ल्रॅकमेलिंग करणारे, खंडणी मागणारे मुठभर पत्रकार दिसतात. त्यांच्या गाड्या वगैरे दिसतात. निष्ठेनं पत्रकारिता करणारे पत्रकार मोठ्या संख्येनं आहेत त्यांची दुःख मात्र कोणालाच दिसत नाहीत. त्यांच्यासाठी कोणीच काही करताना दिसत नाही. पत्रकारांनी आपला धर्म पाळला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करणारा समाज प्रामाणिक पत्रकाराच्या पाठिशी उभा राहताना दिसत नाही. पत्रकारिता हे सतीचं वाण खऱंच पण याचा अर्थ असा नाही की, समाजासाठी आयुष्य वेचणा-या पत्रकारांनी अन्नानं करीत मरावं. पत्रकारांच्या नावानं नेहमीच बोटं मोडणा-या समाजानं याचा विचार करावा. पत्रकारांनी आणि पत्रकार संघटनांनीच आता स्वतःसाठी काही करण्याची गरज आहे. या दृष्टीनं मी काही प्रय़त्न करीत आहे. बघू यात कितपत यश येतं ते.

साभार : पत्रकार एस.एम. देशमुख
यांच्‍या फेसबुकवरुन
 
Top