उस्मानाबाद -: अनु.जाती/ अनु.जमाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्गीय प्रवर्ग तसेच शारिरीक आणि मानसिकदृष्टया अपंग, कुष्ठरोगी इ.साठी व समाज कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय व मौलिक कार्य करणाऱ्या राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव करुन सामाजिक क्षेत्रात काम करीत असलेल्या सेवकांच्या कामाची दाद घ्यावी व इतर कार्यकर्त्यांना त्यापासून प्रेरणा मिळावी जेणेकरुन सामाजिक उन्नतीसाठी कार्यकर्ते सरसावून पुढे यावे, यासाठी शासनाने समाज भुषण पुरस्कार योजना सुरु केली आहे.
    समाजभुषण व्यक्ती पुरस्कारासाठी आवश्यक पात्रता व निकष ठरविण्यात आले असून अनु.जाती/ अनु. जमाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्गीय प्रवर्ग तसेच शारिरीक आणि मानसिकदृष्टया अपंग, कुष्ठरोगी इ. साठी व समाजिक दुर्बल घटकांचे कल्याणासाठी झटणारे नामवंत समाजसेवक असावेत, या क्षेत्रात कमी कमी 10 वर्षे कार्य केलेले असावेत, त्याचे वय 50 वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त असावे, स्त्रीयांचे वय 40 वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त असावे, कोणत्याही व्यक्ती त्यांच्या आयुष्यात एकापेक्षा अधिकवेळा पुरस्कारासाठी पात्र राहणार नाही,  या पुरस्कारासाठी जात, धर्म, लिंग, क्षेत्र याबाबींचा विचार केला जाणार नाही, आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य किंवा कोणत्याही पदाधिकारी या पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत,
      सामाजिक संस्था पुरस्कारासाठी-सामाजिक संस्था ही पब्लिक अॅक्ट 1950 वा सोसायटी रजिस्ट्रेशन अॅक्टनुसार पंजीबध्द असावी, समाज कल्याण क्षेत्रात कमी कमी 10 वर्षे कार्य केलेले असावेत, संस्था राजकारणापासून अलिप्त असावी, तसेच कार्य व सेवा ही पक्षातील व राजकारणापासून स्वतंत्र अलिप्त आसावीत,  जात, धर्म, लिंग, क्षेत्र याबाबींचा विचार न करता फक्त समाज सेवा आणि समाजाचा विकास या क्षेत्रातील कामाचा विचार करुन पुरस्कार दिला जाईल.
      या पुरस्कारासाठी इच्छुकांनी सामाजिक क्षेत्रात कार्य केल्याची स्वत:ची संपुर्ण माहिती व पासपेार्ट आकाराचे तीन फोटो, विना दुराचार प्रमाणपत्र, गैरवर्तनासंबंधी खटला किंवा शिक्षा झाली नसल्याचे तसेच सार्वजनिक संपत्तीचा अपहार केला नसल्याचे प्रमाणपत्र तसेच व्यक्तींने संपादीत केलेले यश किंवा उत्कृष्ट कार्य व इतर पुराव्याचे कागदपत्रे, कात्रणे इ. माहितीसह परिपुर्ण प्रस्ताव दि.20 मार्च पर्यंत पाठवावेत. अर्जाचा नमुना व प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांच्याकडे तीन प्रतीत सादर करावेत,अधिक माहितीसाठी 02472-222014 या दुरध्वनीवर संपर्क साधावा, असे सहायक आयुक्त, समाज कल्याण अधिकारी,उस्मानाबाद यांनी कळविले आहे.

 
Top