सोलापूर : भारत सरकारच्या बालचित्रपट समिती आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बालचित्रपट महोत्सवाचे उदघाटन आज प्रभात चित्रपट गृहात  निवासी उपजिल्हाधिकारी पराग सोमण यांच्या हस्ते करण्यात आले.
     यावेळी करमणूक कर अधिकारी बी. जी. गोरे, सहाय्यक व्ही. आर. पोतदार, बाल चित्रपट समितीचे पी. आर. हलदार, जी. पी. ढेकळे उपस्थित होते.
      दि. ७ ते ११ जानेवारी या कालावधीमध्ये जिल्हा व तालुकास्तरावरुन २० चित्रपटांचा रसास्वाद ९० हजार प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थीं घेणार आहेत. चित्रपट प्रदर्शनाची वेळ दररोज सोलापूर शहरात सकाळी ८ ते १० वाजात तालुक्याच्या ठिकाणी सकाळी ९ ते ११ अशी निश्चित करण्यात आली आहे. प्रदर्शित होणा-या चित्रपटासाठी विनामूल्य प्रवेश आहे.
    उदघाटनपर भाषणात श्री. सोमण म्हणाले की, सोलापूर शहरातील व तालुक्याच्या ठिकाणी  शिक्षकांनी जवळच्या चित्रपट गृहात चित्रपट पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना पाठवावे. चित्रपट पाहण्यासाठी जाणा-या विद्यार्थ्यांसोबत संबंधित शिक्षक पाठवुन विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याबरोबरच त्यांच्या सुरक्षेची योग्य ती काळजी घ्यावी. जिल्हाभरातील ९० हजार विद्यार्थ्यांना २० चित्रपटांची ही मेजवाणी नक्कीच आवडेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
 
Top