उस्मानाबाद -: प्रजासत्ताक दिनाचा मुख्य ध्वजारोहण सोहळा येथील पोलीस परेड मैदान येथे सकाळी 9 वाजून 15 मिनीटानी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते होणार  आहे. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 8-15 वाजता आणि मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे सकाळी 8-25 वाजता होणार आहे. सर्व शासकीय यंत्रणांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांना सोपविलेली  जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडावी,अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.के.एम.नागरगोजे यांनी दिल्या.
     प्रजासत्ताक दिनानिमित्त करावयाच्या तयारीसंदर्भात येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज विविध विभाग प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी डॉ.नागरगोजे यांच्या अध्‍यक्षतेखाली पार पडली.त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीस उप मुख्य कार्यकारी अधिकारी एस.डी.पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर व श्री.तडवी, उपविभागीय अधिकारी प्रशांत सुर्यवंशी यांच्यासह विविध विभागांच्या प्रमुखांची उपस्थिती होती.
     प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी करावयाच्या कार्यक्रमांबाबत जिल्हाधिकारी डॉ.नागरगोजे यांनी संबंधिताना सूचना दिल्या. विविध योजना तसेच उपक्रमांची माहिती देणारे चित्ररथ संचलन कार्यक्रमांत सहभागी होत असतात मात्र यावर्षी संचलनानंतर हे चित्ररथ उस्मानाबाद शहर व लगतच्या गावांमध्ये न्यावेत व या योजना व उपक्रमांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवावी,असे निर्देश त्यांनी दिले.
    जास्तीतजास्त व्यक्तिंना मुख्य शासकीय समारंभात सहभागी होता यावे यासाठी यादिवशी सकाळी 8-30 ते 10  वाजण्याच्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ करण्यात येवू नये.जर एखाद्या कार्यालय अथवा संस्थेला त्यांचा ध्वजारोहण समारंभ करावयाचा झाल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी 8-30 पुर्वी किंवा सकाळी 10 वाजेनंतर ठेवावा,असे उपजिल्हाधिकारी करमरकर यांनी यावेळी सांगितले.   
 
Top