बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: गुजरात येथील जैन साधूवर झालेल्‍या हल्‍ल्‍याच्‍या निषेधार्थ तसेच बार्शीत मोठ्या प्रमाणात उघड्यावर होणा-या मांस‍ विक्रीच्‍या निषेधार्थ बार्शीतील जैन समाज बांधवानी प.पू. साध्‍वीजी अर्चित गुणाश्रीजी आदिसा ठाणा यांच्‍या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रमुख मार्गावरुन मूक मोर्चाद्वारे तहसिलदारांना निवेदन दिले.
        यावेळी बोलताना जैन साध्‍वी प.पू. अर्चित गुणाश्रीजी आदिसा ठाणा यांनी जैन समाज हा अहिंसा तत्‍त्‍वाचे पालन करणारा असल्‍याचे सांगितले. जैन समाजाच्‍या गुरू महाराजांवर प्राणघातक हल्‍ले होणे देशाच्‍या दृष्‍टीने चुकीचे पाऊल्‍ आहे. समाजातील प्रत्‍येक घटकाला घटनेत दिलेल्‍या अधिकाराप्रमाणे आपापले जीवन जगण्‍याचा अधिकार दिला आहे. सर्व साधू, ऋषी, संत यांच्‍याद्वारे समाज विघातक वृत्‍ती नष्‍ट करण्‍याचा सातत्‍याने प्रयत्‍न होतो व सामाजिक शांतता टिकविण्‍याचा प्रयत्‍न होतो. देशात अशांतता माजावी यासाठी काही प्रवृत्‍ती सातत्‍याने प्रयत्‍न करतात. त्‍याना यापुढील काळात जैन समाज बांधवांनी उत्‍तर देण्‍याची गरज आहे. वेळ पडल्‍यास साध्‍वींना तुरूंगवास झाला तरी हरकत नाही. आम्‍ही आत राहूनही या अपप्रवृत्‍तीविरूद्ध उपोषण करून लढा देऊ. शासनाकडूनही या प्रवृत्‍तीना आळा घालण्‍याचा प्रयत्‍न झाला पाहिजे.
         यावेळी दिगंबर जैन संघटनेचे अध्‍यक्ष रमेश मोतीलाल चाकवते, प्रदिपशेठ बागमार, धनूभाई शहा, प्रविण मांडवकर, अतूल सोनिग्रा, चेतन कोठारी, तातेड सर, ओमप्रकाश बाफणा, सुधीर काळेगोरे, संतोष देवधरे, संतोष पांढरे आदीनी आपले विचार मांडले. मोर्चासाठी जैन समाज बांधवानी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. पोलिसांचे एक पथक सदरच्‍या मोर्चासाठी तैनात होते.
 
Top