बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागात पिण्‍याच्‍या पाण्याची परिस्थिती गंभीर असतांनाही शेतकर्‍यांना वीज वितरण कंपनीकडून भरमसाठ बील सातत्याने मिळत असल्‍याने आर्थिक शॉक बसत आहे.
     येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल भड यांनी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे शेतकर्‍यांच्या व्यथा मांडल्या आहेत. बार्शी तालुक्यात अल्प प्रमाणात पाऊस पडला आहे. तलाव, विंधन विहीरी, इत्यादी पाण्याचे स्त्रोत कोरडे पडले आहेत. शेतात पडलेल्या तुरळक पावसावर काही प्रमाणात पिकांची उभारणी झाली परंतु पाण्याअभावी पिके जळून जात आहेत. शेतातील विहीरींना पाण्याचा थेंबही नसतांना विज वितरण कंपनीकडून वारंवार पैशाची मागणी होत असून संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. दुष्काळाची परिस्थिती असतांनाही बार्शी तालुक्यातील एकमेव असलेल्या पर्जन्यमानावर पावसाच्या सरासरीचा अंदाज बांधून चुकीची आकडेवारी नोंदवून बार्शी तहसिलने शेतकर्‍यांचा विश्वासघात केला आहे. जनावरांच्या चार्‍याचा व पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असल्याने शासन स्तरावरुन तात्काळ मदत जाहीर करणे गरजेचे आहे. नव्याने पंचनामे तयार करुन शेतकर्‍यांना संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न व्हावा असे आवाहन निवेदनातून केले आहे.

 
Top