मुंबई :-  राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून (उत्तरांचल) प्रवेश पात्रता परीक्षा  १ व २ जून २०१३ रोजी पुणे  येथे घेण्यात येणार आहे. ही परीक्षा फक्त मुलांसाठीच आहे.
       या परीक्षेसाठी राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांची विहित नमुन्यातील आवेदनपत्रे स्वीकारली जातील ही आवेदनपत्रे विद्यार्थ्यांना २२ जानेवारी पासून उपलब्ध आहेत. अनुसूचित जाती/ जमातीसाठी ४०५ रुपये (जातीच्या दाखल्याच्या सत्यप्रतीसह) आणि  जनरल संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४५० रुपयांचा डिमांड ड्राफ्ट स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या कमांडंट, आर.आय.एम.सी., डेहराडून, पेएबल अॅट डेहराडून (तेलभवन बँक code no.०१५७६) यांच्या नावे काढण्यात यावा.
        परिपूर्ण भरलेली आवेदनपत्रे ३१ मार्च २०१३ पर्यंत आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, १७ डॉ. आंबेडकर मार्ग, पुणे-४११००१ यांच्याकडे स्वीकारण्यात येतील. त्यानंतर आलेली आवेदनपत्रे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारण्यात येणार नाहीत. २० मे २०१३ पर्यंत विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र प्राप्त न झाल्यास या कार्यालयाचा दूरध्वनी क्र. ०२०-२६१२३०६६/६७, फॅक्स क्र. ०२०-२६१२९९१९ या क्रमांकावर संपर्क साधावा. परिषदेच्या www.mscepune.in  या संकेतस्थळावरुनही विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे डाऊनलोड करता येतील. आवेदनपत्र, माहितीपत्र व ५ वर्षाचा प्रश्नपत्रिका संच आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, १७ डॉ. आंबेडकर मार्ग, पुणे-१ या कार्यालयाकडून किंवा 'राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज' डेहराडून, उत्तरांचल २४८००३ यांचे कडून प्राप्त होतील.
    या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे वय १ जानेवारी २०१४ रोजी ११ वर्ष ६ महिने पेक्षा कमी तर १३ वर्षापेक्षा अधिक नाही असे विद्यार्थी पात्र समजण्यात येतील. विद्यार्थ्यांचा जन्म दि. २ जानेवारी २००१ ते  १ जुलै २००२ या कालावधीत असावा. विद्यार्थी दिनांक १ जानेवारी २०१४ रोजी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमध्ये इयत्ता ७ वी च्या वर्गात शिकत असावा किंवा ७ वी पास असावा. आवेदनपत्रासोबत जन्मतारखेच्या व जातीच्या दाखल्याची (अनुसूचित जाती/ जमातीसाठी) छायांकित प्रत व शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट दोन प्रतीत जोडणे आवश्यक आहे.
        परीक्षेसाठी इंग्रजी, गणित आणि सामान्यज्ञान या तीन विषयाचे लेखी पेपर असून यापैकी गणिताचा व सामान्यज्ञानाचा पेपर इंग्रजी अथवा हिंदीमध्ये लिहिता येईल. गणित व सामान्यज्ञान विषयांच्या प्रश्नपत्रिका इंग्रजी/ हिंदी या भाषेत उपलब्ध होतील. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती ७ ऑक्टोबर 2013 रोजी घेण्यात येतील, असे आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी कळविले आहे.
 
Top