
स्वर्णजयंती ग्रामीण स्वरोजगार योजना, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व लेडीज क्लब, उस्मानाबाद यांच्या वतीने स्वयंसहाय्यता समुह-बचतगट निर्मित वस्तुचे जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन-२०१३ अर्थात ग्रामसखी-हिरकणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बचतगटांनी निर्मिती केलेल्या रांगोळी, पापड, हातकाम केलेल्या विविध वस्तू आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. याशिवाय खानदेशच्या मांडयाची ( पोळी ) चव घेण्यासाठी प्रचंड गर्दी दिसत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यासह पुणे, सांगली, ठाणे, जालना आदि भागातून वेगवेगळया वस्तू विक्रीसाठी आल्या आहेत. या महोत्सवात एकूण १०५ स्टॉल्सनी सहभाग नोंदविला आहे.
हे प्रदर्शन १२ जानेवारीपर्यंत सुरु राहणार असून जिल्ह्यातील नागरीकांनी त्यास भेट देण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल.हरिदास आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. केशव सांगळे यांनी केले आहे.
या प्रदर्शनात जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विविध उपक्रमाची माहिती देणारा स्टॉल उभारण्यात आला आहे. राज्य शासनाचे मुखपत्र असणाऱ्या लोकराज्य मासिकाची विक्री तसेच वर्गणीदार होण्याबाबतची सुविधा या स्टॉल उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शासनाचे निर्णय, विविध विभागांच्या योजना, मंत्रीमंडळ निर्णय, स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त माहितीचा या मासिकात समावेश असतो. सर्वांना उपयुक्त ठरेल असे हे मासिक असल्याने त्याचे वर्गणीदार होण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.