नळदुर्ग -: नळदुर्गच्‍या उत्‍तर दिशेला बोरी नदीच्‍या काठावर वसलेल्‍या मैलारपूर येथील श्री खंडोबा मंदीरासमोर शनिवार रोजी विंधन विहीर एका शेतकरी भक्‍ताने खोदून दिली. त्‍यास चार इंचपेक्षा अधिक पाणी लागले आहे. त्‍यामुळे अवघ्‍या काही दिवसावर येवून ठेपलेल्‍या यात्रेकरुना पिण्‍याचे पाणी उपलब्‍ध करुन दिल्‍याने प्रगतशील शेतकरी सत्‍यवान सुरवसे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
    नळदुर्ग येथील श्री खंडोबाची यात्रा दि. 27 जानेवारी रोजी भरत आहे. यावर्षी म्‍हणावा तितका पाऊन न झाल्‍याने बोरी धरण पाणलोट क्षेत्रात पाणी आले नाही. त्‍यामुळे बोरी नदीचे पात्र पाण्‍याअभावी अटून गेले आहे. मैलारपूर येथील खंडोबाच्‍या यात्रेसाठी राज्‍यासह कर्नाटक व इतर राज्‍यातून लाखो यात्रेकरु भाविक नळदुर्गात दाखल होतात. मात्र पाणीटंचाईचे प्रश्‍न सर्वानाच भेडसावत असताना आणि याठिकाणी येणा-या भाविक भक्‍तांना पिण्‍याचे पाणी उपलब्‍ध व्‍हावे, या उदात्‍त हेतूने प्रगतशील शेतकरी तथा मुर्टा (ता. तुळजापूर) ग्रामपंचायतीचे उपसरपंच सत्‍यवान सुरवसे यांनी स्‍वखर्चाने खंडोबा मंदीरासमोर एक विंधन विहीर सव्‍वा तीनशे फुट घेतली. मात्र त्‍यास पाणी लागले नाही. तरी त्‍यांनी खचून न जाता परत दुसरी विंधन विहीर बोरी घाटावर सुमारे तीनशे फुट खोदली. त्‍यास चार इंचपेक्षा अधिक पाणी लागले आहे. त्‍यामुळे मैलारपुरात येणा-या यात्रेकरुना पाणी उपलब्‍ध झाले आहे. सत्‍यवान सुरवसे, युवा कार्यकर्ते गोपाळ सुरवसे यांचे श्री तुळजाभवानी साखर कारखान्‍याचे व्‍हा. चेअरमन सुनीलराव चव्‍हाण, वैभव चव्‍हाण, बळी सुरवसे, अतुल भोसले, बंडू सुरवसे, किशोर सुरवसे, शंकर सुरवसे, भास्‍कर कदम यांच्‍यासह खंडोबा मंदीर ट्रस्‍टचे अशोक मोकाशे, दिलीप मोकाशे, प्रकाश मोकाशे आदीनी अभिनंदन केले.
 
Top