उस्मानाबाद -: बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या कष्टाला योग्य मोल मिळवून देण्याचे उदिष्ट राज्याच्या ग्रामविकास विभागाने ठेवले आहे. त्यासाठी मराठवाडा आणि विदर्भात महिला बचत गटानी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी यासाठी मार्केटींग यंत्रणा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे,असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी केले. याचबरोबर सध्या देशाच्या विविध भागात महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत  आहेत. आपल्या राज्यात अशा घटनांना सक्षमपण सामोरे जाण्यासाठी व त्याचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेतील चौथी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थीनींना  कराटेचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
       स्वर्णजयंती ग्रामीण स्वरोजगार योजना, महाराष्ट्र  राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व लेडीज क्लब, उस्मानाबाद यांच्या वतीने स्वयंसहाय्यता समुह-बचतगट निर्मित वस्तुचे जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन-2013 अर्थात ग्रामसखी-हिरकणी उदघाटन ग्रामविकास पाटील यांच्या हस्ते झाले.त्यावेळी ते बोलत होते.राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, गोदावरी खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार राहूल मोटे, आमदार राणाजगजितसिंह पाटील, नगराध्यक्षा सरस्वती घोणे, पंचायत समिती सभापती प्रेमलता लोखंडे, लेडीज क्लबच्या अध्यक्षा अर्चना पाटील यांच्यासह जिल्हा परिषेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल.हरिदास, अतिरिक्त  मुख्य कार्यकारी अधिकारी  सुर्यकांत हजारे, सुरेश बिराजदार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. केशव सांगळे आदिंची यावेळी उपस्थिती होती.
          पाटील म्हणाले की, महिलांचे संघटन असेल, तरच सक्षमता येवू शकते. जगात ज्या देशात महिलांना समानतेची वागणूक मिळते ते देश आज पुढे गेलेले दिसतात. त्यामुळेच आपण स्त्रीयांचे घटते प्रमाण आणि त्यांना समाजात मिळणारी वागणूक याबाबत विचार करायला हवा. बचत गटाच्या माध्यमातून महिला विविध पदार्थ विक्रीसाठी आणतात. मात्र त्यांना योग्य दिशा  व मार्गदर्शन करुन प्रोत्साहन देण्याची गरज आहे त्यादृष्टीने राज्य शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.
       राज्यात प्रायोगीक तत्वावर राष्ट्रीय जीवनोन्नती अभियान 12 जिल्ह्यात राबविले जात आहे. दारिद्रय रेषेखालील बचतगटांना प्रशिक्षण देवून त्यांना स्वत:च्या पायावर आर्थिकदृष्टया सक्षम करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे.येत्या 5 ते 6 वर्षात राज्यातील सर्व जिल्ह्यात हे अभियान प्रभावीपणे चालेल असा विश्वास श्री. पाटील यांनी व्यक्त केला. बचत गटांच्या उत्पादीत मालाच्या विक्रीसाठी जिल्हा व तालुकास्तरावर विक्री व्यवस्था करण्यात येत आहे त्यादृष्टीने गाळे निर्मितीची योजना हाती घेतली आहे. राज्यात महिला बचत गटाना 4 टक्के दराने कर्ज पुरवठा केला जातो. याचा अधिकाधिक लाभ महिलांनी घेतला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
          ग्रामविकास विभागाने शाळांचा दर्जा तपासण्यासाठी आता मोहिम सुरु केली असून प्रत्येकाला आपल्या गावातील प्राथमिक शाळा कशी आहे हे कळणार आहे. या शाळांना तेथील व्यवस्थेनूसार श्रेणी देण्यात येणार असून आतापर्यंतचा अशी वर्गवारी करण्याचा राज्यात प्रथमच प्रयत्न होत असल्याचे श्री. पाटील यांनी नमूद केले. यामुळे कमकुवत शाळांना श्रेणी सुधारणेसाठी वाव मिळणार असून गावातील नागरीकांनाही शाळा उत्तमरित्या चालावी यासाठी प्रयत्न करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
      डॉ.व्हट्टे यांनी ग्रामविकासाच्या माध्यमातून परिवर्तन शक्य असल्याचे सांगितले. महिलांच्या आर्थिक,शैक्षणिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमुद केले.
        आमदार पाटील यांनी जिल्हा परिषदेने महिलांसाठी हे चांगले व्यासपीठ निर्माण करुन दिल्याचे सांगितले. महिला एकत्रित आल्या तर मोठी ताकद निर्माण होवू शकते हे अशा कार्यक्‌रमाच्या माध्यमातून दिसून येते,असे त्यांनी सांगितले.
         प्रास्ताविकात हरिदास यांनी या प्रदर्शनात जिल्हा व जिल्ह्याबाहेरुन 105 बचतगटांनी सहभाग नोंदविल्याचे सांगितले. याबचत गटांनी विविध प्रकारच्या वस्तू उत्पादीत कराव्यात यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांनीही त्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
              सुरुवातीला पाटील यांच्या लेडीज क्ल्बच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. अर्चना पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मनिषा एखंडे,सिंधुताई मोरे, रेणुका कुलकर्णी या महिला बचत गटांच्या प्रतिनिधींनीही आपले मनोगत व्यक्‍त केले. हे प्रदर्शन 12 जानेवारीपर्यंत सुरु राहणार असून जिल्ह्यातील नागरीकांनी त्यास भेट देण्याचे आवाहन हरिदास आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. सांगळे यांनी केले आहे.
 
Top